दर्पण सह्याद्री न्यूज/ श्रीक्षेत्र राजुर:

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले असून यामध्ये अनेक ठिकाणी जीवित व वित्त हानी होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या चक्रीवादळात भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द येथील शेतकरी सोनाजी शिवाजी खरात यांच्या राहत्या घरावर झाड कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .सुदैवाने जीवित हानी झाली नाही.सविस्तर माहिती अशी की सोनाजी शिवाजी खरात हे जवखेडा खुर्द शिवरातील गट नंबर १०७ मध्ये शेतातील वस्तीवर राहतात.नेहमीप्रमाणे सोनाजी खरात हे शेतातील मशागतीची कामे आटोपून सोमवार (दि.१९) सायंकाळी सहाच्या सुमारास कुटूंबास घरी आले होते.वातावरणात अचानक बदल होऊन वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.वाऱ्यांचा वेग इतका होता की बाजूचे झाड उन्मळून खरात यांच्या घरावर पडले.घरावरील पत्रे झाडाखाली दबली असून घराच्या भिंतीही पडल्या आहेत.संसार उपयोगी वस्तु आणि वर्षभरासाठी साठवून ठेवलेल्या धान्यासह एक लाखाचे नुकसान झाल्याचे शेतकरी सोनाजी खरात यांनी सांगितले. संबंधित विभागाने पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी खरात यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!