दर्पण सह्याद्री न्यूज:
श्रीक्षेत्र राजूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्रीक्षेत्र राजुर येथे श्रीराजुरेश्वर मंदिराच्या पायथ्याशी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित भव्य हिंदू संमेलन नुकतेच संपन्न झाले.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ग्रामविकासचे मराठवाडा व खांदेश संयोजक विलास दहीभाते,राजुरेश्वर गौशाळा प्रमुख सुंदरबिलास काबरा, राजुरेश्वर राधाकृष्ण वारकरी शिक्षण संस्था तथा भागवताचार्य आत्माराम महाराज कदम,श्रीमद् भागवत कथा प्रवक्त्या हभप साधवी त्रिवेणी दिदी देशमुख,हभप मनिषाताई शिंदे यांची उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
देव,देश,धर्म,संस्कृती,समाज आणि राष्ट्ररक्षणासाठी हिंदूबांधवांनी संघटित झाले पाहिजे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते विलास दहीभाते यांनी केले.पुढे बोलताना दहीभाते म्हणाले श्रीराम मंदिर निर्माणसाठी हिंदूंना दीर्घकाळ संघर्ष करावा लागला.परंतु करोडो हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक असलेले श्रीराम मंदिर निर्माण झाल्याचा अभिमान सर्वांना वाटतो आहे.धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या यासारखी आव्हाने पेलण्यास हिंदूंनी सजग असायला हवे. बालसंस्कार शिबीराच्या माध्यमातून मुलांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार रुजवून समाजात जागृती निर्माण करणे गरजेचे असल्याचे दहीभाते म्हणाले.
तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या भागवत कथा प्रवक्त्या हभप साधवी दिदी देशमुख यांनी हिंदूंनी भेदभाव विसरून सामाजिक समरसता निर्माण करून प्रलोभने दाखवून करण्यात येणारे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी जागृत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. भागवताचार्य कदम महाराज यांनी भारतीय संस्कृती आणि संत साहित्याचे महत्व पटवून दिले. याकार्यक्रमास राजूरसह परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम,जयश्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश आंबरे यांनी केले.
