दर्पण सह्याद्री न्यूज
जालना: भावी पिढीला सुजलाम सुफलाम भारताचे सुजाण नागरिक बनवण्यासाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी भारतमातेची आराधना करणे आवश्यक आहे.संघाची स्थापना भारतमातेच्या जयजयकारासाठी झाली आहे.म्हणून भारतमाता हेच आपले सर्वोच्च दैवत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक तथा राष्ट्रीय सेवा भारतीचे संयुक्त महामंत्री विजयराव पुराणिक यांनी केले.
संघशताब्दी वर्षानिमित्त भोकरदन येथे माधव वस्तीच्या वतीने महादेव मंदिर परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित महाकुंभ हिंदू संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा शारदाताई पैठणकर,विश्व वारकरी संघाचे जालना जिल्हाध्यक्ष ह.भ.प.विष्णू महाराज सास्ते यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
पुढे बोलताना पुराणिक म्हणाले,की हिंदू समाजाच्या विघटनामुळे आपण पारतंत्र्यात गेलो होतो. ही उणीव भरून काढण्यासाठी डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. गेल्या १०० वर्षांत संघाने संस्कृती, आरोग्य, कृषी, शिक्षण आणि सेवा क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर्श निर्माण केला आहे.संघटित समाजाच्या माध्यमातून देशाचे पुनरुत्थान करण्यासाठी संघाची स्थापना झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जातीभेद आणि अंतर्गत संघर्ष राष्ट्रासाठी घातक आहेत. चराचरात परमेश्वर पाहणाऱ्या समाजाने जातीभेद गाडून सामाजिक समरसता निर्माण करणे काळाची गरज आहे.नाही तर परकीय व्यवस्था याचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही.संघाच्या शताब्दी निमित्ताने,समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ‘पंच परिवर्तन’ ही संकल्पना मांडली आहे.
कुटुंब व्यवस्था ही भारताची ताकद आहे. सुसंवादातून तिला बलशाली करणे गरजेचे आहे.जातीभेद आणि उच्च-नीचता नष्ट करून समाजात समरसता निर्माण होणे आवश्यक आहे.झाडे,पाणी आणि प्लास्टिक मुक्ती या त्रिसूत्रीचा अवलंब करून निसर्गाशी सुसंगत जीवनशैली जगली पाहिजे.
सार्वजनिक स्वच्छता, नियमांचे पालन व सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे आहे. भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी केवळ हक्क न मागता, जबाबदार नागरिक म्हणून स्वत:मध्ये बदल घडवणे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान घेण्यात आले.या संमेलनास मोठया प्रमाणात हिंदू बांधव,माताभगिनी उपस्थित होत्या.शेवटी हिंदू संमेलन समितीच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले.
