दर्पण सह्याद्री न्यूज:
जालना: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले. २० व्या शतकातील सर्वात बुद्धिवान व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज अशी कीर्ती मिळवली.म्हणूनच पुढील काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विषमताधिष्टीत व्यवस्थेला सुरुंग लावला असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते रमेश शिंदे यांनी केले.
जालना येथील सिद्धार्थ विहार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘जगातील सर्वोत्तम विद्यार्थी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते.
या कार्यक्रमास व्यासपीठावर डी.एस. सोनवणे,रासपचे मराठवाडा प्रमुख ओमप्रकाश चितळकर,नगरसेवक सुनिल बोर्डे, माजेद पठाण अनिल तिरुखे, दिनेश दैने,सतिष जाधव, गणपत भद्रे, सिद्धार्थ खरात,शिवाजी वाघ,म्हस्के सर,उत्सव समितीचे बबनराव लहाने,सतीश खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या ओघवत्या शैलीत पुढे बोलताना शिंदे म्हणाले की डॉ. बाबासाहेबांनी केवळ पदव्या मिळवल्या नाहीत, तर बुद्धांचा समतेचा विचार घेऊन गुलामगिरीत अडकलेल्या समाजाला मानवी स्वातंत्र्याचा श्वास मिळवून दिला. आजच्या सुशिक्षित पिढीने आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे संस्कार युवक-युवतींवर रुजवायला हवे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
याकार्यक्रमास सिद्धार्थनगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.ज्ञानदेव खरात यांनी विद्यार्थ्यांसाठी २०० पुस्तके भेट दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब लहाने यांनी केले.
