दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: येणाऱ्या पंधरवाड्यात सहा ते 17 सप्टेंबर दरम्यान हरितालिका,श्रीगणेश चतुर्थी,ऋषी पंचमी, ज्येष्ठ गौरी पूजन, ईद-ए-मिलाद,अनंत चतुर्थी यासारखे उत्सव साजरे होणार असून यादरम्यान कुणाच्याही भावनांना ठेच पोहचणार नाही याची काळजी घेत सामाजिक सलोखा राखत उत्सव साजरे करावे असे आवाहन हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे यांनी नागरिकांना केले आहे.
भोकरदन तालुक्यातील राजुर पोलीस चौकीत सपोनिस आहिरेंच्या अध्यक्षतेखाली 4 सप्टेंबरला शांतता समितीची बैठक पार पडली.बैठकीस सपोनि श्रीमती भोसले,ज्येष्ठ पत्रकार श्यामराव पुंगळे,जि.प.सदस्य कैलास पुंगळे,सरपंच भाऊसाहेब,भुजंग,नवनाथ फुके,सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर दारूवाले,पोलीस पाटील दादाराव पवार,राजेश टाकळकर,विनोद पुंगळे,शिवाजी सोनवणे,सुरेश पवार, एमएसईबी कर्मचारी बी.ए.साबळे,भगवान नागवे,पोलीस कर्मचारी बीटअंमलदार नरहरी खर्डे,पवार,गोपनीय अंमलदार दीपक सोनवणे,पोकॉ बोर्डे,चरावंडे,गाडेकर यांच्यासह राजूर परिसरातील ग्रामस्थ, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,गणेश मंडळ पदाधिकारी, डी.जे.चालक-मालक यांची उपस्थिती होती.
सामाजिक सलोखा राखा
गणेशोत्सव,ईद-ए-मिलाद हे उत्सव साजरे करत असताना कुणाच्या भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी. समाजभिमुख उपक्रम राबवावे.धार्मिक,सामाजिक सलोखा राखावा.पोलीस समाजकंटकावर नजर ठेवून आहेत.कोणी कायदा हातात घेतला तर त्यावर कडक कारवाई केली जाईल.(संजय आहिरे, सपोनि-पोलीस ठाणे,हसनाबाद)
गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी
उत्सव साजरे करत असताना आपण काय करावे आणि काय करू नये याचे भान असले पाहिजे. नियमांचे तंतोतंत पालन करायला हवे.उत्सवाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायला हवी. पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य राहील.
(श्यामराव पुंगळे, जेष्ठ पत्रकार)
गणेशोत्सवात मास विक्री बंद ठेवावी
गणेशोत्सव हा हिंदू बांधवांसाठी पवित्र असा सण आहे. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, विधिवत पूजाअर्चा व उपवास चालतात.म्हणून मास विक्रेत्यांनी स्वतःहून गणेशोत्सवाच्या काळात मास विक्रीची दुकाने बंद ठेवावित.(विनोद पुंगळे, जिल्हाध्यक्ष -स्वराज्य संघटना)
गणेशोत्सवात काय करावे
मंडळाची रीतसर परवानगी घ्यावी.सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे, वृक्षारोपण,रक्तदान व आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान,देशभक्तीपर देखावे,विविध स्पर्धा,अन्नदान यासारखे अनेक समाजभिमुख उपक्रम राबवून इको फ्रेंडली उत्सव साजरा करावा. ध्वनी प्रदूषण टाळावे. वीज अपघात होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
