दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव , कायदेतज्ञ, दलितोद्धारक, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ ,घटनातज्ञ, कामगारनेते,राजकारणी,समाजसुधारक,तत्त्ववेत्ते,भाषातज्ञमानववंशशास्त्रज्ञ अशा अनेक मानद उपाध्यांनी संबोधले जाते. डॉ. आंबेडकर हे अनेक विषयात निष्णात होते.उत्कृष्ट लेखक,पत्रकार व संपादक म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता.परंतु भारतीय माध्यमतज्ञांनी त्यांच्या समाजभिमुख पत्रकारितेची पाहिजे तशी दखल घेतली नसल्याचे जाणवते. एखादी चळवळ किंवा आंदोलनात वृत्तपत्राची भूमिका किती महत्त्वाची असते हे बाबासाहेबांनी ओळखले होते. तत्कालीन प्रस्थापित वृत्तपत्रे बहिष्कृत समाजाच्या समस्या मांडण्यास असहमती दर्शवत असत.म्हणून त्यांनी बहिष्कृत समाजाच्या न्यायहक्कांसाठी वृत्तपत्र क्षेत्रात पदार्पण केले होते.पुढील काळात मूकनायक,बहिष्कृत भारत,समता,जनता, प्रबुद्धभारत, ही वृत्तपत्र सुरू केली होती.त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना अर्थसहाय्यही केले होते. स्वातंत्र्यप्राप्ती,समाजपरिवर्तन या बरोबरच मानवमुक्ती हा त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य उद्देश होता.बाबासाहेबांनी सुरू केलेली वृत्तपत्रे दीर्घकाळ चालली नसली तरीही त्यातून व्यक्त झालेले विचार आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतात.
स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत समाजाच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी पत्रकारिता क्षेत्र निवडले होते. 31 जानेवारी 1920 ला ‘मूकनायक’चा उदय झाला.सामाजिक अन्यायाखाली भरडलेल्या शोषित,पीडित समूहाचा बुलंद आवाज म्हणजे मूकनायक होय. तत्कालीन प्रस्थापित वृत्तपत्रे बहिष्कृत समाजाच्या व्यथा आणि वेदना मांडण्यास नकार देत असत. म्हणून बाबासाहेबांनी 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले होते.29 जून 1928 ला ‘समता’ नावाचे वृत्तपत्र सुरू झाले होते. स्वातंत्र्य, समता,बंधुत्व या धर्तीवर समाजनिर्मिती व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. 24 नोव्हेंबर 1930 ला जनता हे वृत्तपत्र सुरू झाले होते. गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल हे या वृत्तपत्राचे ब्रीद होते. 4 फेब्रुवारी 1956 ला ‘जनता’वृत्तपत्राचे नाव बदलून ‘प्रबुद्ध भारत’असे नाव ठेवण्यात आले होते.
एखादी चळवळ किंवा आंदोलन यशस्वी होण्यासाठी वृत्तपत्रे महत्वाची भूमिका बजावतात.नेतृत्वाला व्यक्त होण्यासाठी आपले हक्काचे व्यासपीठ हवे असते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे महत्त्व जाणून होते.चळवळीचे ध्येय-धोरण जनसामान्यपर्यंत पोहोचवायचे असेल तर आपल्या विचारांच्या वृत्तपत्राची आवश्यकता होती हे बाबासाहेबांनी ओळखले होते.तत्कालीन प्रस्थापित वृत्तपत्रे बहिष्कृत समाजाच्या व्यथा,वेदना मांडण्यास टाळाटाळ करत असत.म्हणून बाबासाहेबांनी ‘मूकनायक’,’बहिष्कृत भारत’,’जनता’,’समता’,’प्रबुद्ध भारत’ ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना 2500 रुपयांची आर्थिक मदत केली होती.
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय प्रसारमाध्यमांवर अनेक निर्बंध लादले होते.वृत्तपत्रे काढणे,लेख लिहिणे, प्रकाशित करणे यांवर बंधने घातली होती.जाचक अटी लादल्या होत्या.अशा प्रतिकूल परिस्थितीत वृत्तपत्रे चालवणे जिकरीचे काम होते.त्यासाठी पैसा आणि मनुष्यबळाचीही आवश्यकता होती.सर्वं बाबींचा अभाव असतांना देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कामाची व्याप्ती सांभाळून पत्रकारितेसाठी वेळ दिला. वेळेअभावी ते रात्री उशिरापर्यंत अग्रलेख लिहिण्याचे काम करायचे. ते स्वतः वृत्तपत्रांचे संपादनही करत असत.

