दर्पण सह्याद्री न्यूज
जालना:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत मंठा तालुक्यातील आंभोडा कदम येथील संभाजी शिवाजी बोराडे याने ९४.४०% गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, संभाजीने मंठा तालुक्यात मुलांच्या गटातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
संभाजी बोराडे हा मंठा येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी आहे. अत्यंत चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर त्याने ९४.४०% गुणांसह विशेष प्राविण्य श्रेणी मिळवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
त्याच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद, आंभोडा कदम येथील ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी संभाजीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. ‘जिद्द आणि योग्य मार्गदर्शनामुळेच मी हे यश मिळवू शकलो’, अशा शब्दांत संभाजीने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे आंभोडा कदम गावासह मंठा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
