दर्पण सह्याद्री न्यूज :जालना /लातूर

भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भातील बैठक आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली.यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा लातूर शहर जिल्हा भाजपा निवडणूक निरीक्षक राहुल लोणीकर यांनी जिल्हाध्य पदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेल्या निकषांची सविस्तर माहिती दिली.पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी इच्छुक उमेदवारास प्रथमच वयाची अट व इतर निकष लागू करण्यात आले आहेत.तसेच निवड प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी ४५ ते ६० अशी वयाची अट लागू करण्यात आली आहे. नवीन पक्षप्रवेश झालेल्या कार्यकर्त्याचा जिल्हाध्यक्ष पदासाठी विचार केला जाणार नाही. आमदार, खासदार यांचीही जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार नाही.या नवीन निकषानुसार निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असून भाजप लातूर शहर जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक पारदर्शी आणि लोकशाही मार्गाने पार पडेल असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा लातूर शहर जिल्हा भाजपा निवडणूक निरीक्षक श्री राहुल लोणीकर यांनी केले.

भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीसाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांना पार्टीने पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.या बैठकी प्रसंगी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, दत्तराव कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष देविदास काळे, माजी जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे,शैलेश लाहोटी,मनपा विरोधी पक्षनेते शैलेश गोजमगुंडे, अजित कव्हेकर, प्रेरणा होनराव, दत्ता चेवले, रवी केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.भाजपने यंदा हे वर्ष संघटन पर्व म्हणून जाहीर केले आहे. सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंडलाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारास वयाची अट लागू करतानाच इच्छुक उमेदवाराने यापूर्वी संघटनेत जबाबदारी घेऊन पदावर काम केलेले असावे.दोन टर्म सक्रिय सदस्य असलाच पाहिजे.एससी-एसटी प्रवर्गातील महिलांची नावे मंडल पातळीवरून आली पाहिजेत.उमेदवार अनुशासित व प्रामाणिक व्यवहार करणारा असावाअसे निकष लागू केले आहेत.पूर्वी निवड प्रक्रिया प्रदेश पातळीवर नियुक्त केलेल्या निरीक्षकांमार्फत इच्छुकांच्या मुलाखत घेऊन राबवली जात होती. मात्र आता मुलाखती टाळण्यात आल्या असून त्याऐवजी संघटनेत काम करणाऱ्या ठरावीक पदाधिकाऱ्यांना शिफारस करण्यास सांगण्यात आले आहे. याची यादीही निवडणूक निरीक्षकांना प्रदेशकडून दिली गेली आहे. शिफारस करताना इच्छुक उमेदवार कसा पात्र आहे हे प्रपत्रात नमूद करायचे आहे. असेही राहुल लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!