दर्पण सह्याद्री न्यूज:/बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजुर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवार रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक येथे अडकल्याचे समोर येत आहे.भोकरदन तालुक्यातील राजुर येथील संदीप साबळे, पत्नी तेजस्विनी साबळे, पाच वर्षांचा मुलगा कौस्तुभ साबळे हे दाम्पत्य उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे फिरायला गेले होते. त्यांच्या सोबत इतरही 30 पर्यटक होते.त्याचवेळी पहलगाम येथील बैसरन घाटीत पाच किलोमीटरच्या अंतरावर दहशतवाद्यांनी पर्यटकावरील भ्याड हल्ल्ल्च्या बातम्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत होत्या. त्यामुळे राजूर येथील साबळे कुटुंबीयांमध्ये तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु फिरायला गेलेले आम्ही सर्वजण सुरक्षित व सुखरूप असल्याची माहिती श्रीनगर येथून संदीप साबळे यांनी भ्रमणध्वनीवरून दिली तेव्हा कुठे साबळे कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

आमच्या प्रतिनिधीनी भ्रमणध्वनीवरून संदीप साबळे यांच्याशी संपर्क साधला असता साबळे यांनी घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की आम्ही श्रीनगरहुन पहलगाम येथील बैसरन व्हॅली येथे बसमधून उतरलो असता वरतून काही घोडेस्वार व पायदल पर्यटक घाबरलेल्या स्थितीत पळत खाली येत होते.त्यातल्या अनेकजण जखमी झाले होते.तर काहींच्या डोक्यातून रक्तस्राव वाहत होता. वरती दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती सर्वप्रथम त्यांनीच आम्हाला दिली.यावेळी भारतीय सैनिकांनी तत्परता दाखवत आम्हाला एका हॉटेलमध्ये सुरक्षितस्थळी हलविले. आता आम्ही सर्वजण सुरक्षित ठिकाणी असून सुखरूप असल्याचे साबळे यांनी सांगितले. सर्वजण सुरक्षित असल्याचे कळताच साबळे कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

 

श्रीनगरला सुखरूप पोहोचले

संदीप साबळे हे आपल्या पत्नीसह पाच वर्षांच्या मुलासोबत जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनच गेले होते. त्यांच्यासोबत इतरही 30 पर्यटक आहेत. आम्ही सर्व जण पहलगाम येथून रवाना होऊन श्रीनगरला सुखरूप पोहोचलो असल्याची माहिती त्यांनी दिली.

काळ आला होता पण…दैव बलवत्तर- संदीप साबळे, पर्यटक

आम्ही श्रीनगरहुन बैसरण व्हॅली येथे पोहोचलो असता काही पर्यटक जखमी अवस्थेत दिसले.त्यांनीच हल्ला झाल्याची माहिती दिली. यावेळी सर्वजण भयभीत झाले होते. भारतीय सैनिकांनी आम्हाला तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविले.काळ आला होता पण …दैव बलवत्तर.राजुरेश्वराच्या कृपेने आम्ही सर्व जण सुखरुप आहोत.अशी माहिती संदीप साबळे यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!