दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:
छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता आणि जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांना समजावा व त्यांचे शौर्य आणि पराक्रमातुन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून राजूर येथून जवळ असलेल्या चिखली फाटा येथील स्टार इंटरनॅशनल शाळेमार्फत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
चित्रपट दाखवण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांचे बुद्धीचातुर्य, शौर्य,पराक्रम याविषयी माहिती दिली. चित्रपट पहात असतांना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.विवेक डिगांबर म्हसलकर या विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनाने संपूर्ण थिएटरमध्ये दुमदुमले होते.
चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव झाली.त्यांच्या बद्दलचा अभिमान वाढल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
शत्रूने संभाजी महाराजांना अमानुषपणे दिलेल्या यातना बघून चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मन गहिवरून आल्याचे शिक्षकांनी सांगितले. चित्रपट संपल्यावर शिक्षकांनी चर्चेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संभाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. विद्यार्थ्यांना छावा सारखा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी चित्रपट दाखवून आपल्या पूर्वजांच्या शौर्य आणि पराक्रमाची जाणीव करून दिली याबद्दल पालकांनी शाळेचे कौतुक केले.
