दर्पण सह्याद्री न्यूज
जालना: येथील कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये ५ सप्टेंबरला शिक्षक दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने शाळेत सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष विनयकुमार कोठारी, सचिव प्रसन्न कोठारी, प्राचार्य अरुणकुमार पवार, उपप्राचार्या सरोज कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जन्माष्टमी निमित्त शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची अतिशय विलोभनीय रूपे साकारली होती. सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेत आयोजित केलेली उत्साही दहीहंडी ठरली. बाळगोपाळांच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली.शिक्षक दिनाचे औचित्य साधून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान प्राचार्य अरुणकुमार पवार यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षकांच्या पवित्र कार्याचा सन्मान म्हणून संस्थेच्या वतीने शिक्षकांना खास भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सृष्टी कोळकर आणि आयुष निकाळजे यांनी केले.कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
