दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजुर: जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात संसार हे एक व्यसन आहे.संसारी मनुष्याच्या हातून कळत नकळत अपवित्र, अशुद्ध गोष्टी घडत असतात.म्हणून संसाररूपी व्यसनाधीन लोकांनां भगवंताची व्याप्ती कळत नाही. त्यामुळे ते देवाला भजत नाहीत.परंतु या मायावी भावसागरातून मुक्ती मिळवायची असेल तर परमार्थ केलाच पाहिजे.भजन-कीर्तनाच्या माध्यमातून भगवंतांचे नामस्मरण केल्याने मनुष्य जीवनात विरक्ती निर्माण होते असे प्रतिपादन ह.भ.प.उमेश महाराज दशरथे यांनी केले.राजुरेश्वर महागणपती येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा सोहळ्यामध्ये चौथ्या दिवसाचे कीर्तन पुष्प दशरथे महाराज यांनी गुंफिले.कीर्तन सेवेसाठी त्यांनी संसाराच्या अंगी अवघीच व्यसने ! आम्ही या कीर्तने शुद्ध झालो !! आता हे सोवळे झाले त्रिभुवन ! विषम धोऊन सांडीयेले !! ब्रम्हपुरी वास करणे अखंड ! न देखीजे तोंड विटाळाचे !! तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ! ब्रम्ही ब्रम्हरस सेऊ सदा !! या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची निवड केली होती.जीवनात कठोर साधना केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही.संसार व परमार्थ यात पुर्णतः भिन्नता आहे.संसारात सर्वकाही माझे या स्वार्थीवृत्तीतून सत्ता,संपत्ती संग्रही केली जाते तर परमार्थात या सर्वांचा त्याग केला जातो.ईश्वराच्या नामस्मरणातून परोपकारी भावना निर्माण होते व यातूनच दुसऱ्यांसाठी जगण्याची प्रेरणा मिळते.कीर्तनातुन विरक्ती निर्माण होते.म्हणून जीवनात सत्संग झाला पाहिजे.त्या साठी एकांत व सातत्या यांची आवश्यकता आहे असे दशरथे महाराज म्हणाले.यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य कैलास महाराज पवार,ओमकार महाराज कागदे,भगवान महाराज गाडेकर,उमेश महाराज ठोंबरे,कृष्णा महाराज मोरे, लक्ष्मण महाराज कराड,विठ्ठल महाराज शिरसाठ,व्यासपीठ चालक गोरक्षनाथ महाराज सोनवणे, सुदाम महाराज निर्मळ तसेच संत-महंत ,कीर्तन श्रवण करण्यासाठी परिसरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह समिती संयोजक विष्णू महाराज सास्ते यांनी उमेश महाराज दशरथे यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!