दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: मानवी जीवन सुखदुःखाने भरलेले आहे. त्यामुळे आनंदी जीवन जगायचं असेल ग्रंथांशी मैत्री करून भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे.काम,क्रोध,लोभ, मद, मोह,मस्सर या षंढरीपुपासून दूर राहिले पाहिजे. त्यासाठी संतांचा सहवास महत्त्वाचा आहे.इतरांच्या जीवनात दुःख येऊ नयेत अशी त्यांची धारणा असते.ज्ञान, अनुभव आणि भक्तीच्या जोरावर संत भक्तांचा उद्धार करत असतात. मानवी जीवनात भौतिक साधनांच्या अतिवापरामुळे अध्यात्मिक विचार हद्दपार झाले असे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी केले.श्रीक्षेत्र राजूर येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त कीर्तन सेवेचे तिसरे पुष्प गुंफतांना बोलत होते.
पुढे बोलताना जळकेकर महाराज म्हणाले की देव हा चराचरात वसला आहे. प्रभू श्रीराम हे आपले आदर्श आहेत.रामाचे अधिष्ठान सर्वांचे हृदयात आहे.रामनाम घ्यावयाचे असेल तर भावना महत्वाची. कारण जिथं भाव असतो तिथचं देव असतो .वारकरी संप्रदाय वेल आहे. भक्तीरुपाणे तो गगनावरी पोचलाय आहे.संत हे स्वतः वेदना सहन करतात व भक्तांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करतात.
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही सद्गुण दडलेले असतात. ते आपणास ओळखता आले पाहिजे.देव,देश,धर्म टिकवण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे.आपल्या पूर्वजांची इच्छा होती की आयोध्यानगरीत भव्य राम मंदिर झाले पाहिजे. मंदिर उभारल्याचे सुख आज आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. चंद्र,सूर्य,तारे असेपर्यंत प्रभू श्रीराराचे मंदिर अस्तित्वात राहणार आहे. भविष्यात अयोध्या ही देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनओळखली जाणार असल्याचे मत जोगळेकर महाराज यांनी व्यक्त केले.
माणसाने आयुष्यात पद,पैसा,प्रसिद्धी,विद्वत्ता, सौंदर्य याचा गर्व करू नये.प्रेताला शृंगार करू नये. समाजात चांगले काम करत असतांनाही लोकं विरोध करतात.त्याचा विचार न करता कार्य करत रहा.कमी बोला, संयम ठेवा,लोकांशी संवाद साधा.मागील पन्नास वर्षांमध्ये आपण कीर्तनकार निर्माण केले परंतु एकही प्रभावी वक्ता निर्माण करू शकलो नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल .ताकद संपली की समाज फिरकूनही पहात नाही अशी खंत महाराजांनी व्यक्त केली. साधनांचा वापर वाढला आणि विचार हद्दपार झाले.येणाऱ्या काळात आम्हाला सांस्कृतिक वारसा टिकवायचा असेल तर प्रभावी वक्ते घडवावे लागतील तरच वारकरी संप्रदाय टिकेल असे हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर म्हणाले.शेवटी सप्ताह संयोजन समितीच्या वतीने विष्णू महाराज सास्ते यांनी सर्वांचे आभार मानले
