दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर: ईश्वर भक्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी काही लोक भक्तीचे उघड प्रदर्शन करतात.परंतु वरवरची भक्ती काही कामाची नाही. परमेश्वराशी समरस व्हायचे असेल तर अंतःकरणातील भक्तीमध्ये शुद्ध भाव असायला हवा असे प्रतिपादन ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले. श्रीक्षेत्र राजूर येथील अखंड हरिनाम सप्ताह निमित्त कीर्तन सेवेचे दुसरे पुष्प गुंफतांना बोलत होते.

‘आम्हा हरीच्या दासा काही। भय नाही त्रैलोकी।।देव उभा मागे पुढे’ या जगद्गुरू संत तुकोबारायांचा अभंग निवडून त्यावर निरूपण केले.पुढे बोलताना शर्मा महाराज म्हणाले की श्रीगणेश विघ्नांचा नाश करणारी देवता आहे.म्हणून आपण प्रत्येक शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाने करतो.
श्रीगणेशाची निष्ठेने भक्ती केल्यास जीवनातील विघ्नांचा वनाश झाल्याशिवाय राहत नाही.म्हणून गणरायाची नियमित आराधना केली पाहिजे असा सल्ला त्यांनी भक्तांना दिला.
नुकताच प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात संपन्न झाला.पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आयोध्यानगरीत भव्य राम मंदिर निर्माण झाले याचा आम्हा सर्व राम भक्तांना अभिमान आहे. भारतीय संस्कृती अगदी पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिला कोणीही नष्ट करू शकत नाही असे शर्मा महाराज यांनी सांगितले.
मानवी जीवनात आदर्श कृतीला फार महत्त्व आहे. चांगल्या विचारातून कृती घडल्यास आदर्श जीवन घडण्यास मदत होते.ईश्वर प्राप्तीसाठी भक्तांच्या अंतकरणांमध्ये शुद्ध भाव असला पाहिजे.असे समाधान महाराज शर्मा यांनी सांगितले. शेवटी सप्ताह संयोजन समितीच्या वतीने विष्णू महाराज सास्ते यांनी सर्वांचे आभार मानले.
