दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: जालना-छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी प्रचार शुभारंभ प्रसंगी जालना जिल्ह्याचे ग्रामदैवत राजुरेश्वराची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले व निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला.याप्रसंगी भोकरदन तालुक्यातील राजुर येथे झालेल्या प्रचार सभेत नामदार दानवेंनी मतदारांशी संवाद साधला.
यावेळी मंचावर राज्याचे मंत्री अब्दूल सत्तार,आ.नारायण कुचे, आ.संतोष दानवे,माजी आ.सांडू पाटील लोखंडे, जालना लोकसभा प्रभारी एजाज देशमुख, प्रदेश चिटणीस सुरेश बनकर,मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गिते,मनसे शहर अध्यक्ष रवि राऊत, श्रीराम महाजन,राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत काटके,केशवराव तायडे,सतिष घाटगे, जालना जिल्हाध्यक्ष बद्रिनाथ पठाडे,भास्करराव दानवे, रामेश्वर भांदरगे,भाजपचे जेष्ठ नेते शिवाजी थोटे,जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ,गणेश बापू फुके,लोकसभा प्रमुख विजय औताडे,रामदास पालोदकर, श्रीरंग साळवे,जि.प.सदस्या आशाताई पांडे, सरपंच प्रतिभाताई भुजंग,विजय चव्हाण,भुषण शर्मा, ठगन भागवत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत शरद पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये नळणीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर बोर्डे,सागर जैस्वाल, शेख मुस्ताक, अफसर शहा, असिफ शहा,कृष्णा बोर्डे, गणेश बोर्डे, समाधान बोर्डे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.नामदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पुष्पहार व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराव थोटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महायुतीची पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत आहे : केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे
मागील दहा वर्षात मोदी सरकारने जो विकासाचा अजेंडा राबवला तो काँग्रेसला 75 वर्षातही साध्य करता आला नाही. मोदीजींच्या नेतृत्वात देशाचा विकास होत असून सामान्यांच्या जीवनात बदल घडून येत आहे.म्हणून ही लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी जनतेने महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन जालना संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नामदार रावसाहेब पाटील दानवे यांनी जनतेला केले.भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर येथे निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
विकासाच्या मुद्द्यावर दानवेंनी काँग्रेसला खुले आव्हान दिले.काँग्रेसने आतापर्यंत 80 वेळा राज्यघटनेत बदल केला आहे. काँग्रेसने डॉ.बाबासाहेबांचा पराभव केला. त्यांना लोकसभेत जाऊ दिले नाही.भारतरत्न सन्मान देण्यास टाळाटाळ केली.शेवटी व्ही.पी.सिंग सरकारच्या काळात भाजपने डॉ.बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी पाठिंबा दिल्याची आठवण त्यांनी करून दिली.
सबका साथ सबका विकास या धर्तीवर 140 कोटी जनतेसाठी विकासभिमुख योजना राबवल्या. 80 कोटी गरीब लोकांना मोफत अन्नधान्य पुरवठा केला.दहा कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिले.स्वच्छतागृहासाठी अनुदान दिले.चार कोटी लोकांना पक्की घरे बांधून दिली.एक रुपयात पिक विमा,सहा हजार कोटींची सिमेंट रस्ते,एक हजार कोटींची पाणी पुरवठा योजना,सौर ऊर्जा प्रकल्प, शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक यासारख्या जनहीतकारी योजनांची माहिती दिली.महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून आपापला गाव सांभाळावा.मेरा बूथ,सबसे मजबूत या युक्ती प्रमाणे बूथ मजबूत करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
विकासाची गंगा गरिबांच्या झोपडीत पोहोचत आहे : मंत्री अब्दुल सत्तार
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जात आहेत.नामदार दानवेंच्या प्रयत्नाने जालना-जळगाव रेल्वेचा प्रश्न मार्गी लागलाआहे. मतदार संघातील लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून जलजीवन मिशन अभिमान ,डांबरीकरण आणि सिमेंट रस्त्यांचा विकास ,मातोश्री पांदण रस्ता, शेतकरी सन्मान योजना, घरकुल योजना,तसेच अतिवृष्टी व दुष्काळासाठी शेतकऱ्यांना 17 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई, भविष्यात गाव तेथे गोडाऊन ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात आहे.त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा गरिबांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याचे मत राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. नेहमीप्रमाणेच मंत्री सत्तार आणि नामदार दानवेंमध्ये शेर शायरी आणि कलगीतुऱ्याचा सामना रंगला होता.
