दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

जालना:जिल्ह्यात होळीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.ऐन सुगीच्या दिवसात रब्बीचा हंगाम चालू असताना हाती आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे ज्वारी,गहू,हरभरा,कांदा,द्राक्षे,आंबा, डाळींब, मोसंबी,फुलशेती आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसाने निसर्गाच्या लहरीपणामुळे धिंगाणा घालत वादळी वाऱ्यासह शिमगा खेळल्यामुळे क्षणार्धात शेतकऱ्यांच्या स्वप्नाची होळी झाली आहे.रब्बीस मोठा फटका बसल्याने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.वातावरण बदलाची माहिती हवामान विभागाकडून मिळाली परंतु सुगीचे दिवस असल्याने पिकांची कापणी,सोंगणीची कामे चालू होती.मजुरा अभावी उघड्यावर पडलेला माल शेतकऱ्यांस सुरक्षित ठिकाणी हलवता आला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.जालना जिल्ह्यात सर्वच तालुक्यात द्राक्ष,डाळिंब,मोसंबी,ज्वारी,गहू,तूर,हरभरा,मका भाजीपाला व फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्यांचा मोहर गळून पडला आहे.ऐन उन्हाळ्यात सुगीच्या दिवसात अचानकपणे वातावरणात बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. योग्य मोबदल्या आभावी कापूस,सोयाबीन घरात पडून असल्याने शेतकरी आधीच हवालदील असून.परत रब्बी हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्यास झोडपून काढले. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊन होतातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.राजकीय नेत्यांच्या भूलथापा आणि निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांस करावा लागत आहे.शेतात उभी असलेली व काढणीस आलेली पिकं वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे.त्यामुळे रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. एका बाजूस शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही तर दुसऱ्या बाजूस निसर्गाचा उद्रेकही थांबायला तयार नाही.त्यामळे चौही बाजूने कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!