दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर :
भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकरी अनेक वर्षापासून रताळ्याची शेती करत आहेत.आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळाची उपवासाच्या दिवशी फराळ म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. सध्या शेतकऱ्यांचा रताळ्यांचा हंगाम सुरू झाला असून लोणगाव येथील शेतकरी रताळे काढण्यात व्यस्त आहेत. महाशिवरात्रीला बाजारात मोठ्या प्रमाणात रताळ्याची मागणी असते.त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते.
योग्य मोबदला मिळाल्यास महाशिवरात्री खऱ्या अर्थाने गोड होईल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून येत आहे.म्हणून शेतकऱ्यांना योग्य भावाची प्रतीक्षा आहे.

लोणगाव येथील शेतकरी साधारणतः जून-जुलै महिन्यात रताळ्याची लागवड करतात.उपवासाच्या दिवशी फराळ म्हणून बाजारात रताळ्यास मोठी मागणी असते.त्यामुळे शेतकऱ्यांकडून महाशिवरात्रीला रताळ्यांची काढणी केली जाते.रताळे हे पीक कमी खर्चात आणि कमी वेळेत हलक्या प्रतीच्या भुसभुशीत जमिनीत उत्तम प्रकारे येते.खरीप हंगामात पावसाळ्यात या पिकाल पाणी भरण्याची देखील गरज भासत नाही.पीक व्यवस्थापन खर्चही कमी असतो.उत्पन्नही बरेपैकी होते.बाजारभाव मिळाल्यास यातून शेतकऱ्यास आर्थिक फायदा होतो म्हणून लोणगाव येथील शेतकरी रताळ्याची लागवड करतात.
रताळे काढणीस आले की त्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते.रताळे काढल्यानंतर शेतकरी त्यास पोत्यात भरून पॅकिंग करतात. व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन रताळ्याची खरेदी करतात. काही शेतकरी स्वतःबाजारपेठेत जाऊन किरकोळ पद्धतीने विक्री करतात. बहुतांश शेतकरी व्यापाऱ्यांना होलसेल भावात रताळ्याची विक्री करतात.यावर्षी पाऊसपाणी आणि हवामान चांगला असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात रताळ्याचे पीक घेतले आहे.भरणपोषण आणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाल्यामुळे पीकही बरदारपणे आले आहे.परंतु शेतकऱ्यांना आता योग्य भावाची प्रतीक्षा आहे.

प्रतिक्विंटल दोन हजार रुपये भाव मिळावा-अरुण सावंत,शेतकरी, लोणगाव
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आम्ही रताळे पिकाची लागवड केली होती.यावेळी अडीच एकरमध्ये 250 क्विंटल रताळ्याचे उत्पन्न झाले.सध्या व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन 1200 रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी करत आहे.शेतकऱ्यास 1500 ते 2000 रुपये पर्यंत भाव मिळायला हवा.त्यामुळे आर्थिक फायदा होऊन शेतकऱ्यांची महाशिवरात्र गोड होईल.
असे मत शेतकरी अरुण सावंत यांनी व्यक्त केले.
