दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर:लंपी आजाराचा शिरकाव झाल्याने देशातील पशुधन धोक्यात आले असून या आजारामुळे अनेक जनावरे दगावले आहेत.भोकरदन तालुक्यातील तपोवन तांडा येथे ऐन दिवाळीच्या सणाला लंपी आजाराची लागण झालेल्या बैलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सणासुदीला शेतकरी कुटूंबात दुःखाचे सावट पसरल्याने शेतकऱ्याने दिवाळी साजरी केली नाही.हा आजार पुन्हा जनावरांमध्ये शिरकाव करतो की काय अशी चिंताही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सविस्तर माहिती अशी की तपोवन तांडा येथील शेतकरी गुलाब चतरु राठोड यांच्या बैलास मागील आठ दिवसापासून ताप येत होता.अंगावर गुथी आल्याने शरीर सुजले होते.बैलाच्या डोळ्यातून पाणी व तोंडातून लाळ पडत होती.दरम्यान गुलाब राठोड यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तात्काळ उपचार सुरू केले परंतु काही फायदा झाला नाही.आठ दिवस उपचार घेऊनही बैलाच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही.शेवटी काल पशुवैद्यक डॉ.जायभाये यांनी लंपी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

शेतकरी आणि बैलं यांचे जिव्हाळ्याचं नातं आहे. तो आपल्या सर्जा-राजाच्या जोडीवर जीवापाड प्रेम करतो. म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुपालन करतात. त्यामुळे शेती कामास मदत होऊन दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांस आर्थिक फायदा होतो.परंतु लंपी आजारामुळे पशुधनाचा सांभाळ करणे शेतकऱ्यांसमोर एक मोठं आव्हान ठरत आहे.

यावर्षी आधीच शेतकरी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडला आहे.परत ऐन दिवाळीच्या दिवशी बैलाचा मृत्यू झाल्याने राठोड कुटुंबातील सदस्यांनी दिवाळी साजरी केली नाही. शेतकरी गुलाब राठोड म्हणाले,आम्ही मुलांपेक्षाही जास्त जीव जनावरांना लावतो.हे सांगत असतांना परिवारातील इतर सदस्यांना गहिवरून आले होते. नकळत त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गुलाब राठोड यांनी केली आहे.इतर शेतकऱ्यांनीही आपल्या जनावरांची काळजी घेत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ जायभाये यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!