- दर्पण सह्याद्री न्यूज
जालना: बरंजळा साबळे येथील पाझर तलावाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.झाडाझुडपांनी वेढलेल्या भिंतींना जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.ठिकठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत.धरणाची पाळू फुटल्याने दरवर्षी लाखो लिटर पाणी वाहून जात आहे.त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाणी समस्यांना तोंड द्यावे लागते.सिंचनक्षेत्र कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होत आहे. धरणामधून अवैधरित्या गौण खनिज संपत्तीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाटबंधारे विभाग याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाझर तलावाची दुरावस्था झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.धरण सुरक्षा यंत्रणा नुसती नावालाच आहे का, धरणाची नियमितपणे निगराणी का राखली जात नाही, कर्मचारी नियमित उपस्थित का रहात नाहीत.यासारख्या प्रश्नांची विचारणा केली जात आहे.शासनाकडून धरण दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो त्यातून पाझर तलावाची दुरुस्ती करावी अशी मागणी वारंवार करूनही पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.यावर्षी धरणाची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 
वेळीच लक्ष न दिल्यास आंदोलन-संतोष साबळे
बरंजळा साबळे पाझर तलाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.बागायती क्षेत्र वाढल्याने उत्पन्नातही भर पडली आहे.परिसरातील शेतकऱ्यांनाही याचा फायदा होत आहे.याच धरणामुळे गावची तहान भागते आहे.परंतु दिवसेंदिवस धरणाची दुरावस्था वाढतच आहे.भिंतीस तडे गेलेआहेत पाळू फुटली आहे.लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. निवेदने देऊनही दुर्लक्ष केले जाते.संबंधित विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल.असे मत ग्रामस्थ संतोष साबळे यांनी व्यक्त केले.
प्रतिक्रिया
मान्सूनपूर्व दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी येत असतो. मागील काही वर्षापासून अद्यापही निधी प्राप्त झाला नाही. धरण सुरक्षा संघटनेकडे तशी मागणी केली आहे.या विभागात धरण संख्येच्या प्रमाणात मनुष्यबळ कमी आहे. अवैधरित्या गौण खनिज उत्खनन हा विषय महसूल विभागाशी संबंधित आहे.या अगोदरही मंडळाधिकारी, तहसीलदारांना कळविले आहे.पुन्हा स्मरण करून दिले जाईल.धरण सुरक्षा व देखभाल याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल.
एस.जी.राठोड, शाखाधिकारी,पाटबंधारे विभाग,भोकरदन
