दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

जालना:महाराष्ट्रासह मराठवाड्यात सीताफळ लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून अनेक शेतकरी याकडे आकर्षित होत आहेत.ही फळशेती फायदेशीर ठरत यातून कृषिक्षेत्रात मोठी उलाढाल होत असल्याचे दिसून येते.त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होत आहे.म्हणून शेतकऱ्यांनी सीताफळ लागवडीचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक शेतीची कास धरावी असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे राजभवन फार्म आणि महाराष्ट्र राज्य सिताफळ महासंघ पुणे यांच्या वतीने सिताफळ उत्पादक शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले शेतकऱ्यांना संबोधित करत होते.यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य फलोत्पादन विभागाचे माजी संचालक श्री महलले, मेहकरचे निकस सर,अमरावती येथून बोथरा साहेब,रायपूर छत्तीसगडचे श्रीघोष व्हि.एन.आर.,सिताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी,सचिव अनिल बोंडे,उपाध्यक्ष एकनाथ आगे,जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ बि.डी.जडे, खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक कमल सर,गजानन भुते, कृष्णा भुते,हरिभाऊ भुते,भोकरदन तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते,पत्रकार फकिरा देशमुख,शैलेश तळेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना डवले म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फळ शेतीकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. शासनस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती केली जात आहे.यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग,विद्यापीठे,तसेच विज्ञान केंद्रे यामार्फत कार्यशाळा आयोजित करून जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे डवले म्हणाले.

फळ उत्पादक प्रकल्पाचे संचालक व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.उन्हाची पर्वा न करता डवले यांनी थेट बांधावर जाऊन सीताफळ छाटणी तंत्राची माहिती घेतली.त्याबद्दल हरिभाऊ भुते यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.शेतकऱ्यांना फळबागांचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध ठिकाणी कृषी कार्यशाळाचे आयोजन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करावी असेही डवले म्हणाले.सदर कार्यक्रमात महाराष्ट्रासह इतर राज्यातील सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राज्य सिताफळ उत्पादक संघ पदाधिकारी व शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यशाळेस परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!