दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:22 जानेवारी 2024 या शुभदिनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिष्ठापना करून भव्य असा लोकार्पण सोहळा होणार आहे.यामध्ये सर्व समाज बांधवांनी सामील व्हावे म्हणून राजूर येथे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने शोभायात्रा काढून अक्षदा वाटप कार्यक्रमातून श्रीराम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले.
सर्वप्रथम गावातील हनुमान मंदिरात श्रीराम जयराम जय जय राम या महामंत्र्याचा जप करण्यात आला.कलश पूजन करून व प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा रथामध्ये ठेवून गावातून शोभायात्रा काढण्यात आली.वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात श्रीरामाच्या नावाचा जयघोष केला.ग्रामस्थांना श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण देऊन अक्षदा वाटप करण्यात आल्या.
या शोभायात्रेचे ग्रामस्थांकडून जंगी स्वागत करण्यात आले. घरारासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. महिला डोक्यावर कलस घेऊन शोभायात्रेत सामील झाल्या होत्या. जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेण्यात आले.हातात भगवे ध्वज घेऊन तरुणांनी जय श्रीराम च्या घोषणा दिल्या.राजुरेश्वराच्या पायथ्याशी या शोभायात्रेचा समारोप झाला.यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित होते.
