दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: गणरायाची दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर काल शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजा- अर्चा करून गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप दिला.
राजूर येथील गणेश भक्तांनी सकाळपासूनच विसर्जनाची जोरदार तयारी केली होती.अनेक ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला.गणेश भक्तांमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची लगबग दिसून आली.
दुपारी पाचच्या सुमारास गणेश भक्तांनी गणरायाची पूजा व महाआरती केली. लाडक्या बाप्पाला मोदकाचा नैवेद्य भरवण्यात आला.राजूरच्या मुख्यरस्त्याने ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या असा जयघोष होत होता. विसर्जन मिरवणुकीत भक्तांनी ढोलताशांच्या आवाजावर ठेका धरला होता.त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
हळूहळू विसर्जन मिरवणूक पुढे सरकत होती.सहाच्या सुमारास विसर्जन मिरवणूक राजुरेश्वरांचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत होती. जागोजागी महिलांकडून गणरायाचे स्वागत करण्यात आले.
बच्चेकंपनीनेही गणेशोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.नागरिकांनी घरगुती गणेशाचे परिवाराच्या उपस्थितीत पूजा व आरती करून श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात आले.
यावर्षी पाऊस कमी पडल्याने धरणे अजूनही कोरडीच आहेत. त्यामुळे गणेश भक्तांचा थोडासा हिरमोड झाला होता. त्यासाठी अगोदर पाण्याचा शोध घेऊन चांधई एक्को प्रकल्प आणि बानेगाव येथील धरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत जड अंतकरणाने भक्तांनी गणरायास निरोप दिला.राजूर येथे विसर्जन मिरवणुक शांततेत पार पाडली.यावेळी हसनाबाद पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आली होता.
