दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजुर:येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गणेश चतुर्थी निमित्त भाविकांनी राजुरेश्वराच्या पायथ्याशी गर्दी केली होती.भक्तांनी गणेश चतुर्थी निमित्ताने राजुरेश्वराचे दर्शन घेतले.गणेशाची मूर्ती खरेदी करण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता होती.आपल्या लाडक्या बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत केले.यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजराने परिसर दुमदुमला होता.राजुरेश्वराच्या पायथ्याशी गणेशाच्या मूर्तीने परिसर नटला होता.विविध भागातून येऊन मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. घरगुती छोट्या गणपतीपासून तर मध्यम आणि मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती बाजारात उपलब्ध होत्या.गणरायाच्या विधिवत पूजेसाठी फळे,फुले,हार,श्रीफळ, कपूर,धूप,कापसाचे वस्त्र,जानवे,गुलाल अगरबत्ती,दुर्वा, आघाडा,शमीपत्र,बेल,डाळिंब,सीताफळ,मक्का,चिकू,केळी, सफरचंद आदी साहित्य भक्तांकडून खरेदी करण्यात आले.गणेशोत्सवाच्या काळातच गौरी सणांचेही आगमन होणार आहे.बाजारात मांडलेल्या महालक्ष्मीच्या आकर्षक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.महिलांनी महालक्ष्मीचे मुखवटे,पूर्णाकृती मूर्ती,मखर व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी केले.आपला गणपती इतरांपेक्षा वेगळा दिसावा म्हणून गणेश मंडळामध्ये चढाओढ लागते.त्यासाठी गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात सजावट साहित्य खरेदी केले. यामध्ये लायटिंग,थर्माकोल,प्लास्टिक फुलमाळ,मखर, चौरंग, रंगीत पताका, बेगड,चमकी,कार्डशीट,रांगोळी यासारख्या सजावट वस्तुंची गणेशभक्तांनी खरेदी केली.गणेश चतुर्थी निमित्त राजुरेश्वर परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले होते.शोभेच्या वस्तू, फुगे,रिमोटकार, बासरी,बाहुल्या यासारख्या लहान मुलांच्या खेळणीने दुकाने सजली होती.डेकोरेशन साहित्यही मोठ्या प्रमाणत उपलब्ध होते.गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने रस्त्याच्या कडेला दुतर्फा वाहनांची संख्या वाढली होती.वाहतूक व्यवस्था सुरळीत लावण्यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.घरगुती तसेच मंडळाकडून गणेशाचीमूर्ती खरेदीसाठी भाविकांमध्ये उत्सुकता होती.बाजारपेठत चैतन्य निर्माण झाले होते. गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत केले.यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजराने परिसर दुमदुमला होता.एकंदरीत गणेश चतुर्थी निमित्त राजुरेश्वराच्या पायथ्याशी भाविकांची अलोट गर्दी झाल्याचे दिसून आले. गणेश भक्तांनी ढोलताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!