दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
जालना: सलग 17 दिवस मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग करून उपोषण करणारे व सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे पाटील येत्या 30 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा करून मराठा समाजाशी संवाद साधणार आहे. सरकारने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला 50%च्याआत आरक्षण व सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे याविषयी आपण ठाम असल्याचे जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.समितीस पाहिजे तसे पुरावे व अभिलेखे सापडेल नाही असे पत्रकारांनी विचारले असता जरांगे पाटील म्हणाले की पाच हजाराच्यापुढे कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत.सरकारला आणखी किती पुरावे हवे आहेत असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
सरसकट कुणबी प्रमाणपत्रास ओबीसी नेते विरोध करत आहेत यावर बोलताना जरांगे म्हणाले की सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठा यांच्यामध्ये कुठलेही गैरसमज नाहीत. दोन समाजात भांडणे लावण्याचे काम काही नेते मंडळी करत आहेत. त्यामुळेच हा वाद चिघळतोय म्हणून लोकांनी नेत्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये.
आरक्षणाचा निर्णय घेताना सरकारला एका बाजूने विचार करून चालणार नाही. तुम्हाला मराठा समाजाचाही विचार करावा लागेल.आज मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाशिवाय पर्याय नाही.14 तारखेपर्यंत मी बोलणार नाही.तोवर सरकारने सरसकट प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे.
कोकण,पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ,खानदेश याठिकाणी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळत असेल तर मराठवाड्यातील मराठ्यांना का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.म्हणून ओबीसीमधून वेगळा प्रवर्ग तयार करून मराठ्यांना 50 टक्क्यांच्या आधीन राहून आरक्षण देण्यात यावे.गायकवाड आयोगानेही मराठा आणि कुणबी एकच असल्याची त्यांनी आठवण करून दिली.
विदर्भातील ओबीसी मराठा या आरक्षणास विरोध करत आहे असे विचारले असता,जरांगे पाटलांनी सांगितले की विदर्भ ही राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंची जन्मभूमीआहे. येथील कुणबी मराठा बांधव यास विरोध करणार नाही.तसे असेल तर ती शोकांतिकाच म्हणावी लागेल.विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठयांचा व्यवसाय एकच असून दोन्हीही समाजात रोटीबेटी व्यवहार चालत असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
पत्रकारांनी राज्यव्यापी दौऱ्यासंदर्भात विचारले असता जरांगे पाटील म्हणाले की समाजाशी संवाद साधून शांततेचे आवाहन करण्यासाठी हा दहा दिवसांचा दौरा आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाणार असून 14 ऑक्टोबरला आंतरवली येथे सभेचे आयोजन केले आहे .यामध्ये लाखो समाजबांध सामील होणार आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आक्रमक नाही तर शांततेच्या मार्गाने आंदोलन चालूच राहील असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
