दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाला आरक्षणसंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी २४ डिसेंबर ही डेडलाईन देण्यात आली होती. परंतु या तारखेपर्यंत शासनाकडून ठोस भूमिका जाहीर न झाल्यास आक्रमक पवित्रा घेत मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरल्यास पुन्हा एकदा सामाजिक वातावरण ढवळून निघू शकते. त्यामुळे राजूर येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. गणपत दराडे यांनी राजुर ग्रामस्थांना केले .
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजुर ग्रामपंचायत कार्यालयात हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जि.प. सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, पत्रकार, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, मराठा समाजातील समन्वयक, प्रतिष्ठित नागरिक या बैठकीसाठी उपस्थित होते.
आंदोलन करत असताना काही अनुचित प्रकार घडू नये याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी.जाळपोळ किंवा उग्र आंदोलन न करता सामाजिक सलोखा कायम ठेवल्यास यातून विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असेही दराडे यांनी राजूर ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले.
कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिस आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून अशांतता पसरविणाऱ्या लोकांवर पोलीस नजर ठेवून आहे.आक्षेपार्ह चित्रफीत किंवा मजकूर टाकून शांतता भंग केल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे हसनाबद ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी सांगितले.तर नेहमीप्रमाणेच पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले जाईल असे राजूर ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाला आश्वासन देण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य कैलास पुंगळे,सरपंच प्रतिभा भुजंग, ग्रामविकास अधिकारी प्रमोद पुंगळे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती पुंगळे,राहुल दरख, नामदेव पुंगळे, परमेश्वर पुंगळे, व्यापारी संघाचे जगन्नाथ थोटे,सारंगधर बोडखे, रतन ठोंबरे, सरपंच नवनाथ फुके,साहेबराव ठोंबरे,प्रभू कढवणे,प्रा. बाळासाहेब बोराडे,राम पारवे,संजय पुंगळे,आकाश पुंगळे, विनोद पुंगळे,उमेश पुंगळे ,बबलू कव्हळे, भगवान सुद्रीक, गजानन डवले आदीजन उपस्थित होते.शांतता बैठकीतुन पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
