दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत भोकरदन तालुक्यातील जवखेडा(बु) येथील बाबासाहेब बाळाजी पवार याची मंत्रालयीन लिपिक पदावर निवड झाली आहे.सामान्य शेतकरी कुटुंबातील बाबासाहेब पवार याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.
बाबासाहेब पवार यांची मंत्रालयीन लिपिक पदी निवड झाल्याबद्दल राजुर येथे त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.यावेळी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुधाकरराव दानवे, भाजप जेष्ठ कार्यकर्ते भगवानराव नागवे, प्रा.बाळासाहेब बोराडे,शालेय समिती अध्यक्ष संतोष पुंगळे यांच्या हस्ते बाबासाहेब पवार यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बाबासाहेब पवार सामान्य व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे.दोन भाऊ,दोन बहिणी असा त्यांचा परिवार आहे.शालेय शिक्षण जवखेडा येथील कै. दशरथ बाबा माध्यमिक विद्यालयात झाले.महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच दीर्घ आजाराने आईचे निधन झाले. याचा फार मोठा आघात बाबासाहेब याच्या मनावर झाला. अशातच दोन बहिणीचे लग्न,लहान भावाचे शिक्षण आणि आईचा दवाखान्याचा खर्च यामुळे कुटूंबावर कर्जाचा डोंगर वाढत गेला.

अशा बिकट परिस्थितीतही बाबासाहेब याने शिक्षणात खंड पडू दिला नाही.पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्याने छत्रपती संभाजीनगर गाठले. कॉलसेंटर तसेच मिळेल त्याठिकाणी काम करत तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला.परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने अनेक संकटाचा सामना करावा लागला. कित्येकदा उपाशीपोटी राहून दिवस काढावे लागले.परंतु बिकट परिस्थितीत नातेवाईक, शिक्षक, मित्र आणि ग्रामस्थ यांचे वेळोवेळी सहकार्य लाभल्याचे बाबासाहेबने सांगितले.
यशाने अनेकवेळा हुलकावणी दिली परंतु प्रयत्न सोडले नाही. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बाबासाहेब पवार याने एमपीएससी परीक्षेत यश खेचून आणले.त्याच्या या यशामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही.मंत्रालय लिपिक पदासाठी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
