दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:येथून जवळ असलेल्या चनेगाव येथील दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारे सुभाष निहाळ यांनी वाढदिवसानिमित्त होणाऱ्याअनाठायी खर्चाला फाटा देत त्याच पैशातून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला. अल्पशिक्षित सालदाराने शाळा आणि विद्यार्थ्यांबद्दल आदर असल्याचे या उपक्रमातून दाखवून दिले.ग्रामस्थांकडून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सुभाष निहाळ यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्या निमित्ताने होणार अनाठायी खर्च टाळून पैशाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करायचा असे त्यांनी मनोमनी ठरवले होते.ही संकल्पना मित्रांना सांगितली.मित्रांनाही या सामाजिक उपक्रमांस होकार दिला.जन्मदिवशी गावातील जि.प.प्रा.शाळेतील २८५ विद्यार्थ्यांना मोफत वही,पेन्सिल, पेन यासारख्या शालेय वस्तूचे वाटप केले.वाढदिवसाचा अनाठायी खर्च सत्कारणी लागल्याचे समाधान निहाळ यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
सुभाष निहाळ हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. घरच्या शेतीत कुटूंबाच्या गरजा भागत नाही म्हणून ते गावातील दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.त्यांचे शिक्षणही फारसे झाले नाही.ते अल्पशिक्षित आहेत.तरीही विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या मनात आदर आहे.आपण जे कष्टाची कामे करतो अशी वेळ विद्यार्थ्यांवर येऊ नये अशी त्यांची भावना आहे.सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला गावच्या शाळेविषयी अभिमान असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचे काम ते करतात.त्यांचा टायगर ग्रुप या सामाजिक संघटनेतही सहभाग असतो.त्या माध्यमातून रक्तदान, वृक्षारोपण, आपत्कालीन मदत अशा सामाजिक उपक्रमांत ते सहभागी होतात.याहीवर्षी त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप केले.ग्रामस्थांकडून त्यांचे कौतूक होत आहे.निहाळ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावातील तरुणांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे असे मत शालेय समितीचे अध्यक्ष जीवन घुगे यांनी व्यक्त केले. यावेळी निहाळ यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शाळा समिती अध्यक्ष जीवन घुगे,मा.सरपंच उद्धव जायभाये,शा.समिती सदस्य पुंजाराम निहाळ,सुभाष निहाळ,टायगर ग्रुपचे अध्यक्ष अशोक मुटकुळे, सदस्य निवृत्ती महाडिक,दीपक शेवाळे,गणेश घुगे,प्रल्हाद निहाळ, राहुल मुटकुळे,शाळेचे मुख्याध्यापक डोईफोडे सर,यादव सर,देशपांडे सर,चेके सर,सपकाळ मॅडम,जाधव मॅडम,चोबे मॅडम यांसह ग्रामस्थ व विध्यार्थी उपस्थित होते.
