दर्पण सह्याद्री न्यूज
जालना: जिल्ह्यातील वैद्य वडगाव येथील निकिता रामेश्वर वैद्य या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी खेलो इंडिया आणि राष्ट्रीय गतका असोसिएशनच्या माध्यमातून मराठवाड्याचे नेतृत्व करत गतका खेळात राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक तर टेनिस हॉलीबॉल स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर सुवर्णपदकाची कमाई करत घवघवीत यश संपादन केले.क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली त्याबद्दल निकिता वैद्य हिस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था वर्धापन दिन व श्रीराम भांगडीया स्मृतिदिनानिमित्त क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडूंचा सत्कारसमारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, प्रमुख पाहुणे जालना येथील डॉ.ऋषिकेश दीक्षित,संस्था उपाध्यक्ष डी.के देशपांडे,सचिव जयप्रकाश बियाणी,प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, डॉ.महेंद्र शिंदे,प्राचार्य एन.पी पाटील, मुख्याध्यापक नारायण सोळंके, सुखानंद बेंडसुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
खेलो इंडियाच्या माध्यमातून युवकांना शालेय जीवनातच खेळाविषयी आवड निर्माण होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण व्हावे या उद्देशाने देशाच्या विविध भागात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते.
त्याचाच एक भाग म्हणून निकिता वैद्य हिने पंजाब राज्यातील भटिंडा येथे झालेल्या राष्ट्रीय गतका क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील कांस्यपदक तर सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.नगर येथील बॉक्सिंग स्पर्धेतही तिने रौप्यपदकाची कमाई केली होती. जालना आणि परभणी येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेतही तिने यश संपादन केले होते.
ग्रामीण भागात क्रीडा सुविधां, मार्गदर्शनाचा अभाव तसेच क्रीडा क्षेत्राविषयीची कुठलीही पार्श्वभूमी नसताना देखील आई-वडिलांची खंबीर साथ,गुरुजनांचे मार्गदर्शन,स्वतःची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर निकिताने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यश संपादन केले.
तिला या कामी क्रीडा शिक्षक पांडुरंग आंभोरे, पंकज सोनी,नागेश कान्हेकर तसेच वडील रामेश्वर वैद्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यश मिळाले त्याबद्दल निकिता वैद्य चा मान्यवरांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल स्तरातून कौतुक होत आहे.
