दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:येथून जवळ असलेल्या शिवशक्ती आश्रमाच्या माध्यमातून तुपेवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात परमपूज्य खडेश्वरी बाबांच्या पुढाकारातून वृक्षरोपण मोहीम हाती घेण्यात आली असून त्यास वारकरी व ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .शिवशक्ती आश्रम तुपेवाडी ते पंढरपूर दरम्यान हजारो कलमांचे वृक्षारोपण करून संवर्धनाचा संकल्प करण्यात येत आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे वृक्षाचे महत्व पटवून दिले आहे. परंतु दिवसेंदिवस वृक्षाची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या कत्तल होत असून यातून जंगलातील असंख्य वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम मानव जातीस भोगावे लागत आहेत.
वृक्षरोपण मोहिमेसाठी शासन पुढाकार घेत असुन अनेक सेवाभावी संस्था,सामाजिक कार्यकर्ते,शाळा,महाविद्यालय या माध्यमातून वृक्षारोपण केले जाते.परंतु हे सर्व प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येते.असले तरी एक विधायक कार्यक्रम म्हणून प.पु. खडेश्वरी बाबांनी तुपेवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे.
पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात दिंडी ज्याठिकाणी मुक्कामी थांबते त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने शाळा मैदान,मंदिर परिसर तसेच मोकळी जागा आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षरोपण करण्यात येत असून स्थानिक नागरिकांना वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात येत आहे.
यासाठी प.पू.खडेश्वरी बाबांनी कडुलिंब,पिंपळ,जांभूळ,वड, यासारख्या स्वदेशी जातींच्या वृक्षांची लागवड करून पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून पर्यावरण संदर्भात जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.त्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अनेकांना वृक्ष लागवडीची प्रेरणा मिळत आहे.
