सह्याद्री दर्पण न्यूज

राजूर :जालना-राजूर मुख्यरस्त्यावरील तुपेवडी येथील शिवशक्ती आश्रमात रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु मंदिरातील पूज्य खडेश्वरी बाबांच्या जागरुकतेमुळे चोरट्यांचा डाव फसला असून दानपेटी सोडून अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी तेथून पळ काढला.चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून अज्ञात चोरट्या विरुद्ध जालना तालुक्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सविस्तर माहिती अशी की परवाच्या मध्यरात्रीच्या सुमारास शिवशक्ती आश्रम तुपेवाडी येथील मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे उत्तर प्रवेशद्वारचे कुलूप तोडून आत घुसून दानपेटी तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु मंदिरातून तोडफोडीचा आवाज येत असल्यामुळे परमपूज्य खडेश्वरी बाबा यांना जाग आली आणि बाबाजी मंदिराच्या दिशेने निघाले. आपल्याकडे कुणीतरी येत आहे याची चाहूल लागताच चोरटे दानपेटी सोडून तेथून पसार झाले.विशेष बाब म्हणजे चोरट्यांचे धाडस इतके वाढले असून त्यांनी एकाच रात्रीतून परिसरातील पाच मंदिरात चोऱ्या करण्याचा प्रयत्न केला.त्यामध्ये ढवळापुरी-गणपती मंदिर, राळा हीवरा-देवीचे मंदीर,पठाळगाव-कानिफनाथ मंदीर, तुपेवाडी-शिवशक्ती आश्रम मंदिर आणि चिखली येथील दत्तमंदिरात चोऱ्या करण्याचा प्रयत्न झाला. म्हणून आता चोरट्यांनी आपला मोर्चा मंदिराकडे वळवला असल्याचे दिसून येत आहे.याही अगोदर अनेक वेळा चोरट्यांनी मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा धाक आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे.सदरील घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून भक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी तुपेवाडी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.चोरट्यांविषयी पोलिसांना गुप्त माहिती दिल्यास रावसाहेब राठोड यांनी २१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.सदरील घटनेचा तात्काळ शोध लावून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. संबंधित घटने विरुद्ध शिवशक्ती आश्रमाच्या वतीने जालना तालुक्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!