दर्पण सह्याद्री न्यूज
जालना प्रतिनिधी
श्रीक्षेत्र राजूर येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी उपसरपंच गोरक्षनाथ आत्माराम कुमकर (५५)यांची रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीने डोक्यात आणि मानेवर घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.आठवडी बाजारातील गर्दीचा फायदा घेत मारेकरी तेथून पसार झाले आहेत.गुन्हेगारी क्षेत्रातील ही बातमी परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील काही दिवसांपासून जालना शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास पोलिसांना अपयश येत आहे.अशा घटनांमुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ बिघडत असून संबंधित गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाईच मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षनाथ आत्माराम कुमकर हे राजूर-दाभाडी रोडवरील आनंदनगर येथील आपल्या नव्या इमारतीच्या बांधकामावर देखरेख करत होते. रविवारी राजूरचा आठवडी बाजार असल्या कारणाने बाजारहाट करण्यासाठी गोरक्षनाथ कुमकर यांनी स्वतः कामगारांना पगार दिला.पैसे घेऊन कामगार बाजारात निघून गेल्यानंतर बांधकामावर पाणी मारण्याच्या उद्देशाने कुमकर तिथेच थांबले होते.कुमकर हे एकटे असल्याची खात्री करून या संधीचा फायदा घेत अज्ञात मारेकऱ्यांनी ओळख पटू नये म्हणून तोंडावर रुमाल बांधून आनंद नगरममध्ये कुमकर यांच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये घुसून डोक्यात आणि मानेवर कुऱ्हाडीचे वार करत हल्ला चढवला.यामध्ये कुमकर हे जागीच ठार झाले.त्यांचा मृत्यूदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
या घटनेची माहिती मिळताच जालना स्थानिक गुन्हे शाखेचे सुभास भुजंग,उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिग बहुरे,सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार यांनी तात्काळ घटना स्थळी भेट दिली व परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याची दक्षता घेतली.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.यावेळी गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी स्वान पथकही पाचारण करण्यात आले होते.
राजूर हे आठवडी बाजाराचे मोठे केंद्र आहे. परिसरातील खेड्यातील नागरिक खरेदीसाठी येत असतात.त्यामुळे येथील मार्केटमध्ये नेहमीच वर्दळ असते.या गर्दीचा फायदा घेत मारेकऱ्यांनी कुमकर यांच्या खुनाचा कट रचला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बाजारच्या दिवशी भर दुपारी ही घटना घडल्याने व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बातमी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईक व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
गोरक्षनाथ कुमकर हे राजूरमधील प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखले जात होते. तसेच त्यांनी माजी उपसरपंच आणि सोसायटी चेअरमन या पदावरही काम केले होते.परिसरात त्यांची मोठी ओळख होती.परंतु आर्थिक व्यवहार किंवा प्रॉपर्टीच्या वादातून त्यांच्यावर हल्ला झाल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.कुमकर यांचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात होती. यावेळी राजुर ग्रामीण रुग्णालयात शेकडोच्या संख्येने जनसमुदाय जमला होता.त्यामुळे काही काळ येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांनी आरोपींना पकडून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास होकार दिला.रात्री उशिरा राजूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात गोरक्षनाथ कुमकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यानंतर नातेवाईकांसह मुलगा आशुतोष कुमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हसनाबद पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार आणि त्यांची टीम करत आहेत.
