दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक भोकरदनकडून राजूरकडे येत असल्याची खबर मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी तत्परतेने अवैध जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडून त्यातील १६ जनावरांची सुखरूप सुटका करून भोकरदन येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एम.एच.२० ई.एल.७९१९ या क्रमांकाचा आयशर ट्रक भोकरदनहुन राजुरकडे येत होता.या ट्रकमध्ये अवैध जनावरांची वाहतूक होत आहे अशी माहिती हसनाबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली.हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनानुसार पोहेकाँ नरहरी खार्डे ,पोकाँ राहुल भागीले,पोकाँ राठोड यांनी वरील क्रमांकाचे आयशर ताब्यात घेतले.वाहन चालक शेख वसीम शेख आयुब (२३)रा.अब्दाल शहा नगर सिल्लोड व शेख अरबाज शेख मस्तान (२२)रा.ईदगाह नगर सिल्लोड यांनी बैलांना आपल्या ताकदीचा दुरुपयोग करून दोरीने घट्ट बांधून निर्दयपणे व क्रूरतेने चारापाण्याविना अमानुष छळ करून कमी जागेत वाहनात कोंबून कत्तल करण्याच्या उद्देशाने चालवलेल्या वाहनास हसनाबाद पोलिसांनी ताब्यात घेऊन यामधील १६ बैल आणि आयशर वाहन असे एकूण २३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कत्तलीसाठी जाणाऱ्या१६ बैलांची मुक्तता करण्यात आली आहे.
सदरील घटनेचा पंचनामा करून वाहन चालक व त्याचा सहकारी यांवर हसनाबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ नरहर खार्डे,पोकाँ राहुल भागीले हे करत आहेत.पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतामुळे १६ जनावरांची सुखरूप सुटका झाली आहे. पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
