प्रा.बाळासाहेब बोराडे
भारत ही मांगल्याची भूमी आहे.याच भूमीत भगवान गौतम बुद्ध,भगवान महावीर, संत गुरुगोविंद सिंग,संत कबीर, जगद्गुरु संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर यासारख्या अनेक विचारवंतांनी जगाला मानवतेचा संदेश दिला. बाराव्या शतकात क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर हे एक सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे विचारवंत होऊन गेले.महात्मा बसवेश्वर हे थोर तत्वज्ञ, समाजसुधारक,लोककल्याणकारी विचारसरणीचे व सामाजिक क्रांतीचे पुरस्कर्ते होते.त्यांनीवैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवधर्माची शिकवण दिली. निसर्गाशी नाते जोडले.स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. वर्णव्यवस्था, जातिव्यवस्थेवर प्रहार केला.आंतरजातीय विवाह प्रोत्साहन दिले.लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केला.म्हणूनच महात्मा बसवेश्वरांना जागतिक लोकशाही शासन प्रणालीचे जनक म्हणून संबोधले जाते.आज त्यांची जयंती आहे.त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
क्रांतीसुर्य,समाज सुधारक महात्मा बसेश्वर यांनी बाराव्या शतकात सामाजिक समतेचा पुरस्कार केल्याचे दिसून येते. त्यांनी जातीभेद,उच्च-निच्चता ,अस्पृश्यता,वर्णव्यवस्था या सारख्या अनिष्ट प्रथाविरुद्ध बंड पुकारले होते.समाजात प्रबोधन करून परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला.समाजात जनजागृती केली. आपण सर्व एकाच ईश्वरांची लेकरे असून सर्व माणसे समान आहेत.अशी त्यांची धारणा होती.त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सामाजिक समतेचा पुरस्कार केला.
केवळ भारतच नव्हे तर जागतिक लोकशाही शासन प्रणालीचे जनक म्हणून थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांना ओळखले जाते. बाराव्या शतकामध्ये जेव्हा इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीचा जन्मही झाला नव्हता त्या अगोदर कित्येक वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडप या नावाने संस्था स्थापन केली.अनुभव मंडपच्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी स्वातंत्र्य,समता, बंधुत्व या तत्त्वाच्या आधारे दिनदुबळ्या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा केला.
महात्मा बसेश्वर हे विज्ञानवादी होते.त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातुन अज्ञान,अंधश्रद्धेवर प्रहार केला.वृतवैकल्प, यज्ञ,आहुती,उपवास किंवा देवाला बळी देण्याच्या प्रथेला त्यांनी कडून विरोध केला.उपवास केल्याने किंवा देवाला बळी दिल्याने लोकांच्या समस्या सुटत नाही हे त्यांनी तत्कालीन धर्मपंडितांना पटवून दिले.त्यांनी कर्मकांडाला विरोध केला.एकेश्वर वादाचा पुरस्कार केला. निसर्गावर त्यांची असीम श्रद्धा होती.मानवाने निसर्गात ढवळाढवळ न करता निसर्ग नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण यातच मानव जातीचे हित सामावले आहे.बाराव्या शतकात सांगितलेल्या विचारांची आजही आपणास पदोपदी जाणीव होते.
महात्मा बसेश्वर यांच्या तत्त्वज्ञानातून मानवतेची शिकवण मिळते.पृथ्वी तलावरील सर्व माणसे समान असून यात कोणताही भेदभाव नाही ही त्यांची शिकवण होती.भेदाभेद अमंगळ असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. जात,धर्म, प्रांत,वर्ण ,भाषा हे भेद निसर्गाने नव्हे तर माणसानं निर्माण केले आहे.त्यांच्या मते निसर्गास सर्व सजीवसृष्टी समान आहे.त्यामुळे सर्वांना लोकशाहीच्या मार्गाने समाज जीवन जगण्याचा अधिकार आहे.त्यांनी आपल्या तत्वज्ञानातून मानवतेचा संदेश दिला आहे.
महात्मा बसवेश्वरांनी स्त्री-पुरुष समानतेला महत्त्व दिले. तत्कालीन भारतीय समाजात महिलांना दुय्यम स्थान दिले जात असे. मूलभूत अधिकारापासून महिलांना वंचीत ठेवले जात होते. शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.निर्णय प्रक्रियेपासून महिलांना दूर ठेवले जात होते. बालविवाह, सतीप्रथा,केशवपन, विधवा,देवदासी यासारख्या कुप्रथेमुळे महिलांचे जीवन भरडले जात होते.महात्मा बसवेश्वरांनी आपल्या आचारविचारातून स्त्री-पुरुषांना समान संधी निर्माण करून दिल्या.महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाचा पुरस्कार केला. मतदान करणे,विचार व्यक्त करणे याच बरोबर त्यांना धार्मिक,सामाजिक कार्यात सहभागीकरून घेतले.राज्यकारभारत महत्वाच्या ठिकाणी महिलांची नियुक्ती केली.
महात्मा बसवेश्वर हे समतावादी विचारवंत होते.त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले.समाजातील कुप्रथा हाणून पाडल्या.वाईट प्रथेला मूठमाती दिल्याशिवाय समाजात नवनिर्माण होणार नाही याची जाणीव त्यांना होती.समाज निर्मितीचे ध्येय उराशी बाळगून आपले जीवन राष्ट्राप्रति समर्पित केले. जाती व्यवस्था उखडून टाकायची असेल तर मुळावर घाव घालण्याचे मर्म त्यांनी जाणले होते.त्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला.बाराव्या शतकात आंतरजातीय विवाह लावण्याचे महान क्रांतिकार्य त्यांनी केले. तथाकथित धर्ममार्तंडांनी या कार्यास प्रखर विरोध केला. महात्मा बसवेश्वरांवर खोटे आरोप लावून अपमानित करण्यात आले.तरीही महात्मा बसवेश्वरांनी समाज सुधारण्याचे कार्य सोडले नाही.बाराव्या शतकात त्यांनी मागास समाजातील मुलांचा विवाह ब्राह्मण मुलीशी लावून दिला.यावरून त्यांच्या जातीय निर्मूलन कार्याची कल्पना येते.त्यांनी या कार्याची सुरुवात स्वतः पासून केली होती.
काही वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लंडनमधील थेम्स नदी किनारी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले.यावरून महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची कीर्ती सातासमुद्रापार पोहचल्याचे दिसून येते. ही बाब आम्हा भारतीयांसाठी गौरवास्पद आहे. महात्मा बसवेश्वर हे थोर तत्वज्ञ,समाजसुधारक,विचारवंत, लोककल्याणकारी विचारसरणीचे पुरस्कर्ते व सामाजिक क्रांतीचे उद्गाते होते.सर्वच क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच त्यांना जागतिक लोकशाही शासन प्रणालीचे जनक संबोधले जाते.
