दर्पण सहयाद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:आपण पाहतो की सध्याच्या घडीला सरकारी नोकरी लागणे किती अवघड गोष्ट होऊन बसली आहे.परंतु भोकरदन तालुक्यातील व राजूर पासून जवळ असलेल्या चांदई एक्को गावातील अगदी सामान्य कुटुंबातील बहीण-भावानी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर पुणे जिल्ह्यात पोलीस खात्यात निवड झाली आहे. त्यामुळे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी हे यश संपादन केले आहे.निर्मला तेजराव गवळी व ज्ञानेश्वर तेजराव गवळी असे पोलीस खात्यात निवड झालेल्या बहिण-भावाची नावे आहेत.

निर्मला व ज्ञानेश्वर यांनी गावालगतच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.कोणाचे मार्गदर्शन नसताना व वडिलांचे छत्रछाया हरवलेले असताना कुटुंबाची सर्व जबाबदारी आईने स्वीकारली आणि मुलांना पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवले.तेव्हाच या दोघा बहिण-भावाने पोलीस दलात जाऊन आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज करायचे असा निश्चय केला होता.शेवटी त्यांच्या कठोर परिश्रमाला आज यश मिळाले असून निर्मला गवळी आणि ज्ञानेश्वर गवळी या दोघा बहीण-भावानी पोलीस दलात भरती होऊन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
यावेळी ज्ञानेश्वर गवळी यांनी सांगितले की माझे वडील शेतात विहिरीवर काम करत असताना त्यांच्या डोक्याला क्रेनच्या फावड्याचा मार लागून मृत्यू झाला होता. तेव्हा मी दोन वर्षांचा होतो तर माझी बहिण निर्मला ही चार महिन्याची होती.वडील गेल्या नंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आईवर येऊन पडली होती.कसेबसे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले.पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. रहाण्याची व जेवणाची सोय व्हावी म्हणून समाज कल्याणच्या वसतिगृहात राहू लागलो.शिक्षण घेत असल्यापासूनच पोलीस भरतीचा ध्यास लागला होता असे ज्ञानेश्वरने यांनी सांगितले.

कुटुंबात शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील आईने कष्ट करून दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले.आज त्या दोघांचीही पुणे शहरात पोलीस दलात निवड झाली आहे. निर्मला आणि ज्ञानेश्वर यांनी या परीक्षेत प्रथम रँक प्राप्त करून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन हे यश संपादन केले आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊन त्यांना पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे.
एकाच कुटुंबातील दोघे बहिण भाऊ पोलीस दलात भरती झाल्याने ही गोष्ट परिसरातील इतर युवकांना प्रोत्साहन व प्रेरणा देणारी ठरत आहे.माणसांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे निर्मला आणि ज्ञानेश्वरने सिद्ध करून दाखवले आहे.त्यामुळे सर्व स्तरातून या दोघा बहीण-भावांचे कौतुक होत आहे.
