दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
छत्रपती संभाजीनगर:अमृतकाळातील पंचामृत ध्येयावर आधारित हा पहिला सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून यामध्ये शाश्वत शेती, पर्यावरण समृद्धी तसेच महिला, आदिवासी, मागासवर्ग,ओबीसीसह सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असल्याचे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते किशोर शितोळे यांनी व्यक्त केले.नुकत्याच सादर केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पा विषयी प्रतिक्रिया घेताना प्रा.बाळासाहेब बोराडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
पुढे बोलतांना शितोळे म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना,महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनातही भरघोस वाढ करण्यात आली आहे. राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येणार असून शेतकऱ्यांना सन्मान निधीच्या माध्यमातून आर्थिक मदतही मिळणार आहे.म्हणून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार आहे असे स्पष्ट मत किशोर शितोळे यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने शिंदे- फडणवीस सरकारने अर्थसंकल्पाची अभ्यासपूर्ण मांडणी करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.यामध्ये आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, शाश्वत विकास शेतकरी, शेतमजूर, कामगार,महिला व बालकांच्या सर्वांगीण विकास तसेच तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रावर भर देऊन रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून युवकांना उभारी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे शितोळे म्हणाले.
सिंचन क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पातून बीड,धाराशिव जिल्ह्यातील 133 पेक्षा जास्त गावांना फायदा होणार आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल.मराठवाडा वॉटरग्रिडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांना फायदा होणार आहे राज्यात सुरू असलेले 39 प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार असून हर घर जल साठी 20000 कोटींची तरतूद आहे. 5000 गावांत जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ होणार आहे.
शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा,मागेल त्यास शेततळे, नैसर्गिक शेतीवर भर,एसटीमध्ये महिलांना प्रवास सवलत, सौरऊर्जा प्रकल्पास प्रोत्साहन दिले आहे.एकंदरीत सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर केला आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात हा आजवरचा इतिहास आहे असे प्रदेश प्रवक्ते किशोर शितोळे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
