दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च -२०२३मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला नुकताच प्रारंभ झाला असून राजूर येथील मोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेला सुरळीत सुरुवात झाली आहे.ही परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहे.परीक्षा केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.मराठीच्या पहिल्या पेपरला अधिकाऱ्यांनी केंद्राला भेट देऊन परीक्षा संदर्भातील माहिती जाणून घेतली. त्यामुळे परीक्षार्थींवर भरारी पथकाची कडक नजर असल्याचे दिसून आले.

या परीक्षा केंद्रावर एकूण 577 विद्यार्थी परीक्षा देत असून प्रत्येक खोलीत 25 विद्यार्थी याप्रमाणे एकूण 21 दालनात परीक्षार्थींची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रावर मोरेश्वर विद्यालय,मोरेश्वर इंग्लिश स्कूल,विनायक विद्यालय, गणपत दादा इंग्लिश स्कुल,ऋषी महाराज विद्यालय अशी पाच विद्यालयातील विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना तणावमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात म्हणून परीक्षा केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.परीक्षेचे स्वरूप, पेपर सोडवण्याचा कालावधी,बारकोड स्टिकर ,आसन क्रमांक, स्वाक्षरी व पुरवणी या संदर्भात परीक्षार्थींना माहिती देण्यात आली.

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्राने कठोर अंमलबजावणी केली आहे.परीक्षार्थींना तशा सूचनाही दिल्या आहेत.संबंधित परीक्षा अधिकारी,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून बोर्डाच्या निर्देशांचे पालन होत असल्याचे केंद्रास भेट दिलेल्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक तसेच भरारी पथकांची नजर परीक्षार्थींवर असणार आहे. खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. एकंदरीत दहावीची परीक्षा सुरळीतपणे चालू असल्याचे समजते.परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख संतोष सोनूने,संतोष इंगळे,भगवान रगड,सुनील दानवे यासह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
