दर्पण सह्याद्री न्यूज
औरंगाबाद:जनसंवाद व वृत्तपत्र विभागात एम.फील पूर्ण करून पीएचडीचे संशोधन करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागातील विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी मार्गदर्शक उपलब्ध होत नसल्या कारणाने संशोधक विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षिणक नुकसान होत असल्याची तक्रार राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य किशोर शितोळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू,प्र.कुलगुरू,कुलसचिव आदींकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात शितोळे यांनी असे म्हटले आहे की, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील सारथी, महाज्योती, बार्टी, मौलाना आझाद,राजीव गांधी फिलोशिफसाठी एम.फिल पूर्ण केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी मिळणारी फिलोशिफ सलग करण्यासाठी जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात मार्गदर्शक उपलब्ध नाहीत.त्यामुळे अनेक संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रासांनाही सामोरे जावे लागत आहे.
संशोधक विद्यार्थ्यांनी संबंधित विभागास अनेक वेळा विनंती अर्ज करून देखील प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.म्हणून विद्यार्थी संशोधन कार्यापासून वंचित राहत आहे.यावर विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने विचार करून पीएच.डी संशोधक विद्यार्थ्यांसाठी त्वरित मार्गदर्शक उपलब्ध करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड थांबवावी असेही शितोळे यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संशोधनाच्या दृष्टीने आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर निघत असून तीव्र संतापाची भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
