दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
देशात विविध भटक्या जमाती आहेत. त्यापैकीच नाथजोगी समाज आहे. हा समाज महाराष्ट्रातील विविध प्रदेशात विखुरलेला आहे.अनेक जिल्ह्यात नाथजोगी समाजाच्या वस्त्या आढळतात.हा समाज भटकंती करणारा समाज म्हणून ओळखला जातो.भिक्षुकी हा त्यांचा मुख्य व्यवसाय.अज्ञान आणि परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असणार नाथजोगी समाज विकास प्रवाहापासून कोसो दूर आहे.अन्न, वस्त्र,निवारा,आरोग्य,शिक्षण या मूलभूत गरजांसाठी त्यांच्या जीवन संघर्ष चालू आहे. नुकताच आपण ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला.डिजिटल इंडिया,मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारत महासत्ता होण्याची स्वप्नं पहात आहे.परंतु वास्तव चित्र विदारक आहे.अजूनही भटक्या समाजाचे जीवन काळोखमय आहे.हे जळजळीत वास्तव सत्य आहे.
समाजातील शेवटच्या घटकांच्या सर्वांगीण विकासाशिवाय भारत महासत्ता कसा बनेल हा प्रश्न भारतीय समाज आणि देशातील राजकीय पुढाऱ्यांना निरुत्तर करणारा आहे.

नाथ संप्रदाय हा भारतातील एक महत्त्वपूर्ण अध्यात्मिक संप्रदाय म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीशी या समाजाची नाळ जडलेली आहे.हा संप्रदाय देशाच्या विविध भागात विखुरला आहे.मच्छिंद्रनाथ यांनी या समाजाची स्थापना केल्याचे म्हटले जाते.म्हणून हा समाज नवनाथांना आदर्श व गुरुस्थानी मानणारा आहे.

भिक्षुकी हा नाथजोगी समाजाचा मूळ व्यवसाय.गावोगावी भटकंती करून आपला उदरनिर्वाह चालवतात.कालांतराने प्रवाहानुसार समाजाने व्यवसायात बदल केल्याचे दिसून येते.त्यामुळे आजमितीला हा समाज इतरही व्यवसाय करत असल्याचे दिसून येते.पोटाची खळगी भरण्यासाठी आज इथे तर उद्या तिथे अशी भटकंती करावी लागते म्हणून नाथजोगी समाजाची भटका समाज म्हणून ओळख आहे.

नाथजोगी समाज शिक्षणापासून कोसो दूर आहे.कुटुंबातील सदस्यांच्या गरजा भागविण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती करावी लागते.त्यामुळे समाजाचे एका ठिकाणी वास्तव्य नसते.म्हणून नाथजोगी समाजातील मुलं शिक्षणापासून वंचित राहतात.आजही या समाजात शिक्षण घेणाऱ्या मुलांचे प्रमाण अत्यल्प आहे.

शिक्षणआणि व्यवसायिक कौशल्याचा अभाव या कारणाने वर्षानुवर्षेपासून हा समाज शासन दरबारी दुर्लक्षित राहिला आहे.सरकारी दप्तरी या समाजाचा टक्का फारच अत्यल्प आहे.मागील पंच्याहत्तर वर्षात आपण या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणू शकलो नाही हे सत्य आपणास नाकारता येणार नाही.शासनाने या समाजाचा भटक्या जमाती समावेश केला आहे.तरी नोकरी आणि व्यवसायात या समाजाचे नगण्य स्थान आहे.त्यामुळे या समाजाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

हा समाज स्थिर का होऊ शकला नाही किंवा भटकंती का करतो याचे मुख्य कारण म्हणजे भूमिहीनता.नाथजोगी समाज भूमिहीन असल्या कारणाने त्यास पोटापाण्यासाठी गावोगावी भटकंती करावी लागते.व्यवसाय कौशल्य निर्माण करणाऱ्या विकास संस्था अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहचल्या नाहीत. या समाजातील तरुणांना इतर व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक भांडवल नसते.त्यामुळे उपजीविकेसाठी शासनाकडून कायमस्वरूपी जमीन मिळावी अशी मागणी नाथजोगी सामाजिक संघटनेकडून वारंवार केली जात आहे.

अनेकवेळा समाजावर अन्याय होत असल्याच्या घटना घडत असतात.गैरसमज पसरवले जातात.चोरी किंवा लुटेरुच्या अफवेतून कित्येकदा समाजावर प्राण घातक हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.त्या जखमा आजही भळभळत आहेत.यामध्ये कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.चुकीच्या पद्धतीने पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याने हा समाज कायद्याच्या कचाट्यात भरडला जात आहे.त्यामुळे आधीच दारिद्र्यात खितपत पडलेला नाथजोगी समाज गुन्हेगारीच्या खोट्या जाळ्यात गोवला जातोय ही समाजव्यवस्थेची शोकांतिका आहे.

नाथजोगी समाजास पक्की घरे नाहीत.शासनाची घरकुल योजना अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहचली नाही. समाजाच्या वाट्याला पालवरचं जिणे जगावं लागतय.हक्काचं घर मिळावं यासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे.समाजाचे उत्पन्न कमी असल्याकारणाने या समाजाच्या आर्थिक स्थिती फारच कमकुवत आहे. कसेबसे धंद्यावर पोट भरते.शिल्लक काहीच राहत नाही.म्हणून या समाजाला अनेक संकटाचा सामना करावा लागतो आहे.सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या नाथजोगी समाज आजही मागास आहे.नाथजोगी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासन दरबारी प्रयत्न व्हायला हवे.शासनाच्या जनकल्याणकारी योजना गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहचल्या तरच बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण होईल.
