राजूर येथे गुणवंतांचा सत्कार: गोसावी समाजातील गजानन पडेकर ‘डी.फार्मसी’मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
राजूरपासून जवळ असलेल्या तपोवन तांडा येथील लवंगी गोसावी या भटक्या समाजातील गजानन श्याम पडेकर या विद्यार्थ्यांने डी.फार्मसी या विषयात विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले.डी फार्मसीची परीक्षा उत्तीर्ण होणारा गजानन पडेकर हा गोसावी समाजातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.

राजूर येथे राजमुद्रा फाऊंडेशनच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी भटक्या समाजातील गुणवंत विद्यार्थी गजानन पडेकर आणि त्यांच्या पालकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी गोव्हर्नमेंट काँट्रॅकटर सुधाकर दानवे,तपोवनचे सरपंच रामलाल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रा.बाळासाहेब बोराडे,नवनाथ फुके आदी मान्यवरांच्या हस्ते गजानन पडेकर यास शाल व पुष्पहार देऊन गौरविण्यात आले.

तपोवन तांडा येथील गोसावी समाज हा पोटापाण्यासाठी गावागावी फिरत असतो.त्यामुळे या समाजातील मुलं शिक्षणापासून वंचित राहतात.म्हणून हा समाज आजही मागासलेला आहे.गजाननचे वडील शाम पडेकर व आई मंगलाबाई पडेकर यांनी कष्ट करून मुलांना शिकवले. गजाननचे आईवडीलांना मंजुरीसाठी बाहेर गावी फिरावे लागते त्यामुळे शिक्षण घेत असताना गजानन पडेकरची फरफट झाली. त्यासही आईवडिलांसोबत गावोगावी जाऊन भटकंती करावी लागली.परंतु आशा बिकट परिस्थितीतही गजानन याने शिक्षणाची कास कधीच सोडली नाही.खाजगी शिकवणी न लावता गजानन पडेकर या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले.त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी जालिंदर पुंगळे, विकास राठोड,जगन गाडेकर, ज्ञानेश्वर चोले, सारंगधर डोके,शाम पडेकर,पंडीत मुळेकर, प्रकाश मुळेकर,विकी पडेकर,पवन पडेकर,पुंजाराम मुळेकर,सचिन मुळेकर, अशोक पडेकर, राहूल उमाट यासह अनेक जण उपस्थित होते
