दर्पण सह्याद्री न्यूज

रेल्वे पिटलाईन शुभारंभ: जालना रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट; दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर-केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

———————————————————-जालना:ज्याप्रमाणे दिल्ली,मुंबई येथील रेल्वेस्थानकावर आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे जालना येथील रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.जालना येथील रेल्वेस्थानकाचा कायापालट करण्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली.यातून रोजगार निर्मिती होऊन मराठवाड्यातील मागासलेपण दुर होण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जालना येथील पिटलाईनच्या कामाच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाध्यक्ष-केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पाटील, तर प्रमुख अतिथी केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड,पालकमंत्री-अतुल सावे,माजी मंत्री-आ.राजेश टोपे, आ.संभाजी पा.निलंगेकर,आ.कैलास गोरंट्याल,भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार संतोष पाटील दानवे, आमदार नारायण कुचे,माजी आमदार विलास खरात,शिवसेना जिल्हापक्षप्रमुख भास्कर आंबेकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे,जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे,मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा मीना आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.मोदीजी केवळ निवडणुका पुरता विचार करत नाहीत तर पुढील पंचवीस- पन्नास वर्षांचे नियोजन करून योजनांची अंमलबजावणी करतात.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी’राष्ट्र प्रथम,सदैव प्रथम’ या युक्ततीप्रमाणे कार्य करतात.त्यांच्या विचाराने आम्हालाही राष्ट्रीय कार्य करण्याची प्रेरणा मिळते.मोठ्या महानगरात मिळणाऱ्या सुखसोयी ह्या ग्रामीण भागातील गोरगरीब, दलित आणि आदिवासी भागातील लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे असेही ते म्हणाले.मराठवाडा ही संतांची,शूरवीरांची भूमी आहे.संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वकल्याणाची मागणी केली.छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीयांच्या मनात स्वराज्य निर्मितीसाठी लागणारी प्रेरणा निर्माण केली. बालमनावर संस्कार झाल्यामुळे आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पवित्र वाटतात.जालना रेल्वेस्थानकाची नवीन डिझाईन ही जालना जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजुरेश्वराच्या मंदिराची प्रतिकृती आहे.ही आम्हा सर्वांसाठी गौरवाची बाब आहे.एकेकाळी जपान,जर्मनी देशाकडून रेल्वे विकत घेतली जात असे परंतु मोदीजींच्या नेतृत्वात देशात स्वदेशी तंत्रज्ञानातून रेल्वेची निर्मिती होत आहे ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.म्हणून विदेशातील बुलेट ट्रेनपेक्षाही देशातील वंदे भारत ट्रेन सर्वदृष्टीने सक्षम आणि सुरक्षित आहे.मुंबई, दिल्लीच्या धर्तीवर जालना रेल्वेस्थानक उभारणार असल्याचेही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करणार- ना.रावसाहेब पाटील दानवे(केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री)

अनेक वर्षांपासून मतदारसंघातील जनतेसाठी विकास कामे करत आलो आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.देशात भाजपचे सरकार नसल्याने मला देशपातळीवर प्रशासकीय कामाचा अनुभव फार कमी मिळाला.परंतु आजमात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनानुसार काम करण्याची संधी मिळतेय ही माझ्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे.विविध योजनांच्या माध्यमातून जालन्याचे मागासलेपण दूर होण्यास मदत होत आहे.ड्रायपोर्ट,आयसीटी सेंटर,स्टील उद्योग,सिड्स पार्क, व रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.समृद्धी महामार्गाच्या बाजूला रेल्वेमार्ग जोडण्याचा मानस आहे.पूर्वी युपीए सरकारच्या काळात रेल्वेसाठीअत्यल्प प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला जात असे.परंतु मोदींजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आला आहे.जालना-राजूर,फुलंब्री- राजूर,भोकरदन-राजूर या रस्त्यांच्या विकास कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्यात अनेक विकासात्मक प्रकल्प येत आहेत. आपण सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करणार असल्याचे मतही केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

मोदींजींच्या नेतृत्वामुळे देशाचा विकास होत आहे-डॉ.भागवत कराड(केंद्रीय अर्थराज्यमंत्री)

मा.रावसाहेब पाटील दानवे हे केंद्रात मंत्री झाल्यापासून अनेक योजना मराठवाड्यात येत आहेत.त्यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लागत आहे.परंतु एवढ्यावरच न थांबता जालना व छत्रपती संभाजीनगर येथे आयटी उद्योग समूहाचा विकास झाला पाहिजे.मराठवाड्यात अधिक प्रमाणात रेल्वे जाळे निर्माण व्हायला पाहिजे.सध्या भारत ही जगातील पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे.लवकरच भारत विकसित देश म्हणून उदयास येईल.मोदींजींच्या नेतृत्वामुळे देशाचा विकास होत असल्याचे मत केंद्रीय राज्यअर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांनी व्यक्त केले.

जालना-संभाजीनगर जुळी शहरं म्हणून उदयास येत आहेत.ना.अतुल सावे(पालकमंत्री,जालना जिल्हा)

जालना आणि संभाजीनगर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून भविष्यात ही दोन्ही शहरं एक होऊन जुळी शहरं म्हणून ओळखली जातील.त्यामुळे भविष्यात दोनही शहराच्या विकासासाठी प्रयत्न झाले पाहिजे.जालना, संभाजीनगर येथून हजारो प्रवासी खाजगी बसने प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाया जातो. प्रवाशांचा मानसिक त्रास कमी करण्यासाठी जालना-मुंबई रेल्वे फेऱ्यात वाढ केली पाहिजे.शेंद्रा एमआयडीसीमध्ये आधुनिक भौतिक सुविधा निर्माण केल्या गेल्या पाहिजे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुंबई,हैद्राबाद , पुणे,याठिकाणी जावे लागते.त्यांना हे शिक्षण मराठवाड्यात मिळायला हवे.त्यासाठी आयटी क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे.आपण पालकमंत्री म्हणून प्रथमच जालना येथे आलो आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.

जालन्याचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल-आमदार राजेश टोपे(माजी मंत्री)

रेल्वे पिटलाईनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊन जालना जिल्ह्याचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल असे मत माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने मराठवाड्याला दोन मंत्रीपदे दिली आहेत. त्यामुळे जालन्याचा अविकसित जिल्हा म्हणून लागलेला डाग आता पुसला जाईल.राज्य अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा.रेल्वे विकास कामाचा चमत्कार घडवला तसाच कोळशाचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्परता दाखवावी.जिल्ह्यातील विकास कामासाठी आम्ही नेहमीच सोबत आहोत असेही आमदार राजेश टोपे म्हणाले.

बदनापूरला सर्व प्रकारच्या रेल्वेगाड्या थांबल्या पाहिजे- आ.नारायण कुचे

केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वातून विकास गंगा जालन्यात पोहचली आहे.डबल इंजिनचे सरकार असल्याकारणाने मराठवाड्यासह जालन्याचा विकासजलदगतीने होणार आहे. बदनापूर हे तालुक्याचे ठिकाण असून जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे.येथील व्यावसायिकांना व्यवसायानिमित्त ये-जा करावी लागते. परंतु बदनापूर रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने व्यापाऱ्यांना मोठी अडचण निर्माण होते. म्हणून बदनापूर येथील रेल्वेस्थानकावर सर्व प्रकारच्या रेल्वेगाड्या थांबल्या पाहिजे असे मत आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केले.

ना.दानवे यांच्यामुळे जालना शहराच्या विकासाला गती-आमदार कैलास गोरंट्याल

केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना शहराच्या विकासाठी अनेक योजना खेचून आणल्या आहेत.ड्रायपोर्ट, रेल्वे पीटलाईन,सिमेंट रस्ते,पाणीपुरवठा योजना,वृक्षारोपण चळवळ,आयसिटी सेंटर,पासपोर्ट कार्यालय समृद्धीमहामार्ग यासारख्या अनेक योजनांमुळे जालना शहर व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली असे मत जालना तालुका मतदार संघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केले. माझा पक्ष जरी वेगळा असला तरीही विकासभिमुख नेतृत्वातून जिल्ह्याचा कायापालट होत असेल तर त्यांचे कौतुक करणे हे आपले आद्य कर्तव्य बनते असेही आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!