दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:उन्हाळा सुरू झाला की अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात.विहिरी अधिग्रहण करून वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो.त्यामुळे प्रशासन यंत्रणेवरही ताण येतो.परंतु राजूर गावं यास अपवाद आहे. ग्रामपंचायत नियोजनातून राजुर हे मागील काही वर्षापासून टँकर मुक्त झाले आहे. कडक उन्हाळ्यातही वार्डनिहाय नियमित पाणीपुरवठा करून ग्रामपंचायतीने राजूरकरांची तहान भागवली आहे.
मागील दुष्काळी परिस्थितीत राजुरकरांनी पाणीटंचाईच्या झळा सोसल्या आहेत.रात्री-अपरात्री पाण्यासाठी जागर करावा लागत असे.उन्हाच्या रखरखीत अनवाणी पायाने हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. विकतच्या पाण्याशिवाय पर्याय नव्हता. टँकर लॉबी फोफावली होती. सामान्य माणसांची दिवसभरातील अर्धी कमाई पाण्यावर खर्ची होत होती.एवढा आटापिटा करूनही पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती.
आजमितीला श्रीक्षेत्र राजूरचे चित्र पालटले आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवेंचे मार्गदर्शन आणि ग्रामपंचायत नियोजनातून ग्रामस्थांनी पाणीटंचाईवर मात केली आहे. ना.दानवेंच्या प्रयत्नातून अनेक योजना खेचून आणल्या आहेत.राजुरसाठी बाणेगाव प्रकल्प पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ४८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून खर्च करण्यात आला आहे.जलजीवन मिशन अंतर्गत १० कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत. त्या माध्यमातून बाणेगाव धरणात स्वतंत्र विहीर,२५ किमीची पाईपलाईन,४ जलकुंभातून ७ लक्ष लिटर क्षमतेत वाढ झाल्याने ग्रामस्थांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत आहे.त्यामुळे उन्हाळ्यातही राजूरकरांची तहान भागत आहे.
पाण्याचा वापर जपून करा- प्रतिभा भुजंग, सरपंच,राजूर
राजूरसह परिसरातील गावांना बानेगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. शेतीसाठीही पाणी उपस होतो.धरणावर मर्यादा येत आहेत.कडक उन्हामुळे नैसर्गिक जलस्रोत अटत गेले. विहिरींनी तळ गाठला.धरणातील पाणी पातळी कमी झाली.वेळेवर पाऊस न पडल्यास पाणीटंचाईची समस्या भेडसावू शकते. म्हणून पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन सरपंच प्रतिभा भुजंग यांनी ग्रामस्थांना केले आहे.
