दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर : श्रीगणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर आणि परिसर बाप्पाच्या आगमनाने भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.यंदा पावसाने दांडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीचे सावट असले, तरी गणेशभक्तांच्या उत्साहात कायम होता.ढोलताशांच्या निनादात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या वतीने गणरायाची भव्य प्रतिष्ठापना करण्यात आली.​गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजूरची मुख्य बाजारपेठ आणि मंदिर परिसर सजला असून, येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यावर्षी परिसरातील वालसा,चिखली, डावरगाव,जवखेडा खुर्द, केदारखेडा, चांधई ठोंबरी या गावांतील अनेक मूर्तिकार व व्यावसायिक गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाले होते.गणपती संस्थान,ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने मूर्तिकार व्यावसायिकांसाठी जागा उपलब्ध करून दिली होती.​बाजारपेठेत यंदा आकर्षक मोठ्या मूर्तींसोबतच सुबक लहान मूर्तींनाही मोठी मागणी दिसून आली. तसेच पूजा साहित्य, फुलोरा आणि रंगीबेरंगी सजावटीच्या वस्तूंमुळे खरेदीसाठी भक्तांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.यादरम्यान लाखोंची आर्थिक उलाढाल झाली आहे.​दुष्काळी परिस्थितीचे सावट दूर करण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात राजूरस परिसरात समाधानकारक पाऊस पडू दे आणि सर्वत्र सुखसमृद्धी येऊ दे असे साकडे गणेशभक्तांनी राजुरेश्वराच्या चरणी घातले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा:गणेश चतुर्थीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते राजूरेश्वर महागणपतीची पूजा करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी कार्तिक पानिग्रही,गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुधाकर दानवे,विश्वस्त गणेश साबळे, अण्णासाहेब भालेराव, नारायण पुंगळे सरपंच भाऊसाहेब भुजंग,श्रीरामपंच पुंगळे, व्यापारी महासंघ अध्यक्ष मुकेश अग्रवाल,भगवान नागवे, तुळशीराम गायकवाड, तलाठी विजय गरड, स्थानिक विश्वस्त,पुजारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!