दर्पण सह्याद्री न्यूज
भोकरदन : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे.या आंदोलना समर्थनार्थ जाहीर पाठिंबा देण्यासाठी भोकरदन तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली.यामध्ये शेकडो मराठा तरुण सहभागी झाले असून सर्व आंदोलक अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात :-

रॅलीच्या सुरुवातीला भोकरदन येथील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मराठा बांधवांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील व्यासपीठावर चढून घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
हातात भगवे झेंडे आणि घोषणांनी परिसर दणाणला :-

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक मोटारसायकलवर भगवे झेंडे लावण्यात आले होते.मराठा सेवकांनी गळ्यात भगवे रुमाल टाकून ‘एक मराठा, लाख मराठा’,’मनोज जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या.
आंदोलनाची तीव्रता वाढली :-

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आणि आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण मराठवाड्यामध्ये आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.जरांगे पाटलांच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भोकरदन येथील मराठा सेवकांनी अंतरवाली सराटीपर्यंत रॅली काढण्यात आली असल्याचे सांगितले.
