दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: राजूरसह परिसरातील चनेगाव,धामणगाव, तपोवन, लोणगाव, चांदई, पळसखेडा,चिखली, डोंगरगाव आणि खामखेडा शिवारात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाचे गडद सावट पसरले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

यावर्षी जूनमध्ये पावसाने दमदार सुरुवात केल्याने खरिपाची पेरणी यशस्वी झाली होती.परंतु मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने कापूस,सोयाबीन,मूग,भुईमूग,उडीद, मका,तूर ही पिकं पाण्याअभावी करपू लागली.फळबागा, फुलशेतीनांही मोठा फटका बसत आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसाअभावीशेतकऱ्यांचापोळासण कडू:-
“मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे बियाणे, खते,फवारणी खर्च आणि वर्षभराची मेहनत वाया जाताना दिसत आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावरच बळीराजावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांचा पोळा सण कडू होताना दिसत आहे.”
शेतकऱ्यांच्या शासनाकडे मागण्या:-

“शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत शासनाने पाहू नये.तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा.सर्वच पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.प्रति हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी.”
प्रतिक्रिया
“मी यावर्षी पाच एकर सोयाबीन पेरली होती.सुरुवातीस पेरणी योग्य पाऊस पडल्याने पीक जोमात आले होते.परंतु ऐन फुलोऱ्यात आणि शेंगा पकण्याच्या वेळेसचं पावसाने पाठ फिरवली.आता उभे पीक वाळून जात आहे.रात्रं-दिवस घाम गाळून पोसलेलं पीक जळताना पाहून काळजात धडकी भरते.डोळ्यात अश्रू येतात.”
गजानन सानप, शेतकरी, चनेगाव.
