दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर: श्रावण महिन्यात येणारा नागपंचमी हा सण दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राजूरसह परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नागपंचमीला पारंपरिक पद्धतीने वारुळाची पूजा व नागराजाला दूध अर्पण करण्याची प्रथा आहे.यादिवशी झाडांना झोके बांधून खेळले जातात. परंतु ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने त्यावर पर्याय शोधून बच्चेकंपनीने घरासमोरील गॅलरीत झोके बांधून नागपंचमी सणाचा आनंद लुटला.पूर्वी नागपंचमीच्या दिवशी गावातील मुली,नवविवाहिता आणि महिला नवीन वस्त्रे परिधान करून समूहाने झोके खेळत असत.परंतु हे चित्र सध्या विरळ झाल्याचे दिसून आले.  दिवसेंदिवस ग्रामीण भागातील सणातील उत्साह कमी होताना दिसत आहे.आधुनिक काळात आपले उत्सव, ग्रामसंस्कृती टिकवण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले.

गावखेड्यातील माणसं नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने महानगरात स्थिरवली आहेत.वाढते शहरीकरण, डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे ग्रामीण भागातील महाकाय वृक्ष गायब झाली आहेत. त्यामुळे झोके बांधायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्याय म्हणून राजूर येथील बच्चेकंपनीने थेट आपल्या घरासमोरील गॅलरीच्या छताच्या कड्याला झोके बांधून ‘एक झोका तुझा,एक झोका माझा’ म्हणत नागपंचमी साजरी केली.यावर्षी कमी पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस पडावा म्हणून नागराजांची मनोभावे पूजा करून वरूनराजाला साकडे घातले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!