दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
जालना: (दि.०५ सप्टेंबर २०२६) महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून घोषित केला असून, जालना जिल्ह्यात दि. १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर ध्वनीवर्धक व DJ Sound System चा वापर केला जातो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता लक्षात घेता ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना डीजे व ध्वनीवर्धकाचा वापर करून ध्वनी प्रदूषण होणार नाही, याबाबत पूर्वसूचना देण्यात यावी.
तसेच,ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करून डीजे अथवा मोठ्या आवाजातील ध्वनी प्रणालीचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांवर व संबंधित पदाधिकाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजबीरसिंह संधू,यांनी दिला आहे.
गणेशोत्सव हा उत्साह, भक्ती व सामाजिक सलोखा जपणारा सण असून सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून ध्वनी प्रदूषणमुक्त व शांततामय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जालना पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
