दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: पासून जवळ असलेल्या तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रमाच्या माध्यमातून तुपेवाडी ते पंढरपूर मार्गे पायी दिंडी सोहळा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले असून प.पू.खडेश्वरी बाबा आणि देवा बाबांच्या पुढाकारातून दिंडीमार्गे गाव तेथे वृक्षारोपण हा उपक्रम हाती घेतला असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हजारो झाडांच्या कलमांची लागवड केली जात आहे.या उपक्रमास उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आषाढी एकादशी निमित्त शिवशक्ती आश्रमाच्या वतीने पायी दिंडी व वृक्षरोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंबड रोडवरील अंतरवाला ,पारेश्वर महादेव मंदिर,शेवगाव फाटा या ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले.
शिवशक्ती आश्रम ते पंढरपूर दरम्यान कडुलिंब,पिंपळ,वड, जांभूळ या कलमांचे वृक्षारोपण करून संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. दिंडी ज्याठिकाणी मुक्कामी राहते त्याठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने शाळा व मंदिर परिसर, मोकळी जागा तसेच रस्त्याच्या कडेला दुतर्फा वृक्षारोपण करून स्थानिक नागरिकांना संवर्धनाची जबाबदारी दिली जात आहे. तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रमांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
