दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर: येथील टेंभुर्णी रोडवरील खरात हॉस्पिटलमध्ये उपचारदरम्यान तपोवन येथील तुळशीराम नाईक तांड्यावरील बारा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.दिशा प्रेमचंद चव्हाण (12) असे मयत मुलीचे नाव आहे. डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी दवाखान्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.ही घटना 11मार्च रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडल्याचे समजते.या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.ग्रामीण भागातील आरोग्याविषयीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सविस्तर माहिती अशी की 11 मार्च रोजी सकाळी तुपेवाडी जवळील तुळशीराम नाईक तांडा येथील दिशा प्रेमचंद चव्हाण (12) ही मुलगी आपल्या वडिलांसोबत राजूर येथील खरात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठीआली होती. डॉ.खरात यांनी दिशावर उपचार केल्यानंतर घरी जाण्याची परवानगी दिली. परंतु घरी आल्यानंतर दोन तासांनी दिशाची तब्येत पुन्हा बिघडली.वडिल दिशाला घेऊन तात्काळ खरात हॉस्पिटलमध्ये गेले.दिशाची तब्येत जास्तच खालावल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी मुलीस राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचे सांगितले.
राजूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून दिशाला तात्काळ जालना येथे हलविण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने जालना रुग्णालय गाठले.परंतु तपासणी नंतर डॉक्टरांनी दिशास मृत घोषित केले.हे ऐकून दिशाच्या वडिलांना मोठा धक्का बसला. नातेवाईकांनी मृतदेहासह रुग्णवाहिका परत राजूर येथील खरात हॉस्पिटलमध्ये आणून डॉक्टरांना जाब विचारण्यास सुरुवात केली.भावना अनावर झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत कारवाईची करण्याची मागणी केली.चुकीच्या उपचार पद्धतीमुळे दिशाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
हॉस्पिटल समोर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता.सदरील घटनेची माहिती मिळताच हसनाबद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय आहिरे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.पोलीस अधिकारी व गावातील नागरिकांच्या समजुतीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास होकार दिला.सायंकाळी उशिरा तुळशीराम नाईक तांडा येथे दिशावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यविधीस उपस्थित नातेवाईकांच्या भावना अनावर झाल्या होत्या.या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हॉस्पिटलमध्ये येताच दिशाच्या आईने फोडला हंबरडा

पोटची लेक गेल्याने दिशाच्या आईला दुःख अनावर झाले होते.हॉस्पिटलमध्ये येताच तिने एकदम हंबरडा फोडला. थोडा वेळ ती बेशुद्धही झाली होती.त्यावेळी वातावरण भावुक झाले होते.माझी मुलगी मला परत आणून द्या अशी केविलवाणी विनवणी करत होती.नातेवाईक दिशाच्या आईची समजूत काढून शांत करण्याचा प्रयत्न करत होते. अशी वेळ कुणावरही येऊ नये अशी चर्चा हॉस्पिटल समोर जमलेला समुदाय आपापसात करत होता.
