दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
जालना:अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीमारचे पडसाद जालन्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले.महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी अंतरवाली सराटीसह रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमी आंदोलकांची भेट घेतली आहे. काल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी अंबड येथील शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली व प्रकृतीविषयी विचारपूस केली.आंदोलकांस सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल असे आश्वासनही दिले.यावेळी त्यांच्या सोबत जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, आ.नारायण कुचे उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.रावसाहेब दानवे म्हणाले की अंतरवाली येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर झालेला लाठीमार अत्यंत दुर्दैवी व दुःखद आहे.शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशसही राज्य शासनाने दिले आहेत.दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही ना.दानवें म्हणाले.
आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून काही भागात होणाऱ्या हिंसक घटना तातडीनं थांबण्याची गरज आहे.लोकशाहीच्या मार्गानं सुरु असलेलं आंदोलनाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागू नये. त्यामुळे मी मराठा समाज बांधव,संघटनांचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन ना.दानवें यांनी केले.
आम्ही आंदोलक व सर्व समाजबांधवांच्या पाठीशी आहोत. पूर्णपणे मराठा समाजाला सहकार्य मिळेल.राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक असून त्या दृष्टीने सरकार काम करत आहे असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले.मराठा समाज बांधवांना शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.
