दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी संपल्यानंतर अखेर १५ जून २०२३ रोजी शाळेची घंटा वाजून शाळेचा श्रीगणेशा झाला आहे. पहिल्याच दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट कानी पडला असून विद्यार्थी गणवेशासह शाळेत दाखल झाल्याचे दिसून आले .शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मुख्याध्यापक,शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षांच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावर्षीही खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांची जमावाजमव करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.त्यासाठी अनेक संस्थांनी शाळा सुरू होण्यापूर्वी कॅम्पिंग चालवले होते . 
शाळा म्हटले की प्रत्येकाच्या मनात जुन्या आठवणी रेंगाळत असतात शाळेमध्ये अनेक गमती जमती घडत आपण शिक्षण घेत असतो.शाळेतून आपणास अनेक मित्र-मैत्रिणी भेटत असतात. हसत खेळत ज्ञानमंदिरात आपण विद्येचे धडे गिरवत असतो. शाळेच्या माध्यमातून बालकांचा शारीरिक,मानसिक ,बोद्धीक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक बालकास शाळेविषयी आकर्षण असते.

राजूरमध्ये अनेक शैक्षणिक संस्था असून परिसरातील विविध ठिकाणाहून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात.यावर्षी १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाला आहे.त्यामुळे बाजारामध्ये शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची लगबग विद्यार्थी व पालकांमध्ये दिसून येत आहे. पहिल्या दिवशी लहान मुलांनी पालकांसोबत शाळेत जाणे पसंत केले. तर काही चिमुकल्यांनी आई-वडिलांनी आपल्या सोबत शाळेत बसण्याचा आग्रह धरला.पालक सोडून गेल्यानंतर अनेक चिमुकल्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे दिसूनआले. तर काही मुलं हसत खेळत आंनदाने शाळेत पोहचली. 
कोरोना काळात शाळेमध्ये खंड पडल्याने मोठ्या प्रमाणात मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले होते.आता मात्र नियमित शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासातून उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आहे. पहिल्या दिवशी परिपाठानंतर शाळेच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षांच्या विद्यार्थ्यास शुभेच्छा देऊन शाळेचा श्रीगणेशा करण्यात आला.
